अमरावती: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. फासेपारधी समुदायातील या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह समुदायाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आश्रमशाळेचे संचालक मतीन भोसले यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांसमोर येऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

उद्या किंवा परवा मंत्रालयात बैठक

प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र झाल्याचे पाहून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या विद्यार्थ्यांना सामोरे गेले. यावेळी मतीन भोसले यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या किंवा परवा मंत्रालयात वरिष्ठ स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून यात फासेपारधी समुदायाला कशा प्रकारे चांगली मदत करता येईल, याविषयी निर्णय घेतला जाईल. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. फासेपारधी समुदायातील अनेक लोक उड्डाणपुलाखाली वास्तव्याला आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्याविषयी प्रयत्न केले जातील, असेही आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

संस्थेची मागणी काय?

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत पाडण्यात आली. इमारतीच्या नुकसान भरपाईपोटी मंजूर ६ कोटी रुपये तात्काळ देण्यात यावेत. तसेच पूर्वीच्या मंजूर ५१ लाखांपैकी रखडलेली १७ लाख रुपयांची उर्वरित रक्कम संस्थेला वर्ग करून प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला १० एकर शेतजमीन आणि ११ वी-१२ वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी संस्थेची मागणी आहे. प्रलंबित मागण्यांसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली आहेत.

फासेपारधी समाज संघटनेच्या मागण्या काय?

१४ एप्रिल १९९० पूर्वीपासून सरकारी ‘ई-क्लास’ शेतजमिनीवर काबाडकष्ट करणाऱ्या भूमिहीन फासेपारधी बांधवांना त्या जमिनींचे मालकी हक्काचे पट्टे कायदेशीररित्या नावावर करून द्यावेत, पारधी पॅकेजअंतर्गत शासनाने मंजूर केलेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीपैकी १ कोटी ४० लाख रुपये ७ महिला बचत गटांना (प्रत्येकी २० लाख) रोजगार सुरू करण्यासाठी तात्काळ वितरित करावेत, मंगरुळ चव्हाळा येथील ९० पात्र फासेपारधी कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करावे आणि समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःचा रोजगार सुरू करता यावा यासाठी राज्यात स्वतंत्र ‘फासेपारधी आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे, या मागण्या आहेत.