धुळे : येथील रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सर्वांगीण विकास करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारा जुना मालधक्का काढून त्याऐवजी नव्या ठिकाणी प्रशस्त आणि आधुनिक मालधक्का (गुड्स शेड) उभारण्यात येत आहे. नव्या जागी गुड्स शेड उभारल्यास रेल्वे स्थानकातील वाहतूक अधिक सुटसुटीत होऊन भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक मोकळी जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धुळे रेल्वे स्थानकाचा एकेकाळी उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मालवाहतूक केंद्र म्हणून लौकिक होता. पूर्वी धुळ्यातील प्रताप टेक्सटाईल मिल तसेच महाराष्ट्र ऑइल मिल या मोठ्या औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणावर कोळशाची आवश्यकता भासत असे. त्या काळात वर्षातून किमान सहा रॅक कोळसा धुळे रेल्वे स्थानकावर येत असे. साधारणपणे ३० वॅगनचा एक रॅक येथे आणला जात असे. याशिवाय भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) धान्याचीही मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. एफसीआयच्या धान्य वाहतुकीसाठी ४२ किंवा ४८ वॅगनचा पूर्ण रॅक धुळ्यात येत असे, अशी माहिती यावेळी मिळाली.
धुळ्यातली मालवाहतूक घटली
नंदुरबार आणि धुळे जिल्हा एकत्रित असताना, साधारण १९९० ते २००४ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले एफसीआयचे धान्य प्रामुख्याने धुळ्याहूनच पाठवले जात होते. मात्र अमळनेर, नंदुरबार, दोंडाईचा आणि नरडाणा या ठिकाणी स्वतंत्र मालवाहतूक व्यवस्था निर्माण झाल्यानंतर साहजिकच धुळे रेल्वे स्थानकावरील गुड्स म्हणजेच मालवाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली. २००८ नंतर एफसीआयची वाहतूकही हळूहळू घटत गेली. सिमेंटची वाहतूक २०१२ पर्यंत लक्षणीयरीत्या कमी झाली होती, ती २०१८ पर्यंत केवळ तुटपुंजी स्वरूपात सुरू होती. त्यानंतर सिमेंटची मालवाहतूकही जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे.
जुने गुड्स शेड काढले
या पार्श्वभूमीवर धुळे रेल्वे स्थानकावर जुन्या गुड्स शेडची जागा बदलून नव्या ठिकाणी अत्याधुनिक गुड्स शेड उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानक परिसरातील मोकळी जागा वाढणार असून भविष्यात वाढीव रूळ टाकण्यासाठी तसेच नवीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले जुने गुड्स शेड एका बाजूला असले तरी काही वेळा लोडिंग-अनलोडिंग करताना अडथळे निर्माण होत होते. मात्र नव्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह उभारण्यात येणाऱ्या गुड्स शेडमुळे मालवाहतुकीची प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि खर्चिकदृष्ट्या परवडणारी ठरणार आहे.
अमृत भारत योजनेचा लाभ
दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत धुळे रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून खर्चाची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, स्थानक परिसराचे सुशोभीकरण यासोबतच गुड्स शेडसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. अमृत भारत योजनेतून स्थानकाचा चौफेर विकास सुरू असताना दुसरीकडे गुड्स वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे वास्तव आहे. रेल्वे विभागाने विस्तार व आधुनिकीकरणाची कामे हाती घेतल्याने काही काळ ट्राफिक घटले असले, तरी आता उभारली जाणारी गोदामे आणि आधुनिक गुड्स शेड पूर्ण क्षमतेने वापरात आली, तर धुळे रेल्वे स्थानकावरील मालवाहतुकीत पुन्हा वाढ होण्याची गरज आणि शक्यता दोन्ही असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यामुळे धुळे शहराच्या औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक विकासाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रॅक म्हणजे नेमके काय?
रेल्वेच्या मालवाहतुकीत कोळसा, धान्य, सिमेंट, खत, लोखंड आदी वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारे अनेक डबे एकत्र जोडले जातात. अशा ३०, ४२, ४८ किंवा कधी कधी ५८ ते ६० वॅगनचा एक पूर्ण संच तयार होतो. हा संपूर्ण संच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकाच वेळी नेला जातो. या पूर्ण संचालाच ‘रॅक’ असे म्हणतात. कोळशाचा रॅक साधारणपणे ३० वॅगनचा, एफसीआय धान्याचा रॅक ४२ किंवा ४८ वॅगनचा, तर सिमेंटचा रॅक साधारण ४० ते ४५ वॅगनचा असतो.

