अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा; इंग्रजीतील पोषण तक्त्यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

मागील अडीच वर्ष करोनामुळे सर्वच क्षेत्र संकटात सापडले असताना अशा संकटसमयी आरोग्याची घडी बसविण्याचे काम आशा, अंगणवाडी सेविकांनी केले.

ns3 morcha
अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

नाशिक : मागील अडीच वर्ष करोनामुळे सर्वच क्षेत्र संकटात सापडले असताना अशा संकटसमयी आरोग्याची घडी बसविण्याचे काम आशा, अंगणवाडी सेविकांनी केले. परंतु, सध्या त्यांच्यासमोर विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि पर्यवेक्षक यांचा जाच, पूर्वीप्रमाणे कामाचा बोजा, पोषण तक्ता मराठीऐवजी इंग्रजीत असल्याने तो भरतांना येणाऱ्या अडचणी, या समस्या मांडण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर मोर्चा काढला.

अंगणवाडी सेविकांनी करोना काळात महत्वपूर्ण भूमिका निभावली. करोना काळात बहुतेक वेळा अंगणवाडी केंद्र बंद अवस्थेत राहिली तरी प्रत्येक घरी जाऊन माता आणि बालकांना सर्व प्रकारची मदत करण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आले. करोना काळात जीव धोक्यात ठेवून केलेले काम अतिजिकिरीचे आणि धाडसाचे होते. करोनाच्या भीतीने बहुतांश जण घराबाहेर पडणेही टाळत असताना अंगणवाडी सेविका मात्र जनसेवेसाठी घराबाहेर पडत. वेगवेगळय़ा प्रकारचे काम त्यांनी धोका माहीत असतानाही केले. विशेष म्हणजे कामाचा पुरेसा मोबदला मिळत नसतानाही त्यांनी काम केले. आता पुन्हा नव्याने पूर्वीसारखे काम करताना अंगणवाडी सेविकांच्या नाकी नऊ येत आहे. बहुतेक अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषा अवगत नसतांना भ्रमणध्वनीवरुन पोषण तक्ता भरताना तो मराठीऐवजी इंग्रजी भाषेत असल्याने त्यांना अडचण येत आहे. ते भरणे काहींना फारच जाचक ठरत असून हा तक्ता मराठीत असावा, अशी त्यांची मागणी आहे. निकृष्ठ आणि जुन्या भ्रमणध्वनींऐवजी नवीन भ्रमणध्वनी द्यावेत, शासनाने सुरु केलेल्या अमृत आहार योजनेचा किफायतशीर दर ठरवावा, इंधन देयकासह अन्य खर्च यांचा ताळेबंद असावा, निकामी झालेल्या गॅस शेगडय़ा आणि सिलिंडर यांचा खर्च करावा किंवा तशा प्रकारच्या सूचना ग्रामपंचायतींना द्याव्यात, आदी मागण्यांकडे मोर्चाव्दारे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेचे राजेश सिंह यांनी माहिती दिली. मुळातच शालेय शिक्षणाची पूर्वतयारी ही अंगणवाडीतून होत असते. लहान मुलांवर संस्कार होत असतांना ते कुटूंबातील अन्य सदस्य यांच्यावरही होत असतात. त्यामुळे पायाभूत शिक्षणाचे केंद्र हे अंगणवाडीच म्हणावयास हवे. असे असतांना वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकारी हे अंगणवाडी सेविकांना, मदतनीसांना वेठीस धरून काम करून घेत असतात, अशी तक्रार सिंह यांनी केली. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anganwadi sevika helpers attempts attention issues movement ysh

Next Story
पाऊसपाणी पेरण्यांची टक्केवारी अर्धशतक ओलांडणार; हंगाम महिनाभर पुढे सरकल्याची परिणती
फोटो गॅलरी