जळगाव : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आधीच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असताना, आता या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची तुलना खरातशी केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

अनिल पाटील यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “संजय राऊत हे दुसरे खरात झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या अलीकडील विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने ज्या प्रकारे लोकांना खोटे भविष्य सांगून दिशाभूल केली, त्याचप्रमाणे राऊत सध्या राजकीय भविष्यवाणी करत असून, तीही तितकीच भ्रामक असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना (ठाकरे गट) सातत्याने सत्ताधारी पक्षांवर टीका करत आहे.

विशेषतः संजय राऊत यांनी त्यांच्या आक्रमक वक्तव्यांनी महायुतीला जेरीस आणले आहे. गेल्या काही दिवसांत तर त्यांनी अजित पवार गट तसेच शिंदे गटातील काही आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करून राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.

काय म्हणाले अनिल पाटील?

शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर असतानाही संजय राऊत यांनी पारोळा, पाचोरा, मुक्ताईनगरातील शिंदे गटातील आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर, आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया राऊत यांना थेट प्रत्युत्तर म्हणून पाहिली जात आहे. “महाराष्ट्रात सध्या संजय राऊत यांच्यासारखे नेते स्वतःला मोठे भविष्यकार समजत आहेत. मात्र, त्यांनी इतर पक्षांबद्दल अंदाज व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. त्यांच्या पक्षातील अनेक आमदार आणि खासदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी आधी घर सांभाळावे, मग इतरांवर भाष्य करावे”, असे आमदार पाटील म्हणाले. पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, शिवसेना ठाकरे गटाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वादाला आणखी नवे वळण

दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे आधीच समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा राजकीय स्तरावर वापर होत असल्याची टीकाही काही राजकीय निरीक्षकांकडून केली जात आहे. सामाजिक आणि कायदेशीर दृष्टीने गंभीर असलेल्या या मुद्द्यावरून राजकारण तापल्याने मूळ मुद्दा बाजूला पडत असल्याची चर्चा आहे. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता, आगामी काळात या विषयावरून आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक धारदार होत असून, प्रत्येक विधानाला राजकीय अर्थ लावला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या वादाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.