पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीचे पत्र घोटीच्या सरपंचांकडे सुपूर्द

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटीकरांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा असलेला पाणी प्रश्न ग्रामपंचायतीने सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सुटण्यास मदत झाली आहे. पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीचे पत्र घोटीचे  सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

घोटी शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने पाणी पुरवठय़ाच्या समस्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. घोटी ही इगतपुरी तालुक्यातील प्रमुख व्यापारी पेठ असल्याने तालुक्यातील सर्व गावे बाजारासह इतर कामांसाठी घोटी येथे येत असतात. तालुक्यातील बहुतांश प्रमाणात नोकरदार मंडळी घोटीतच स्थायिक आहेत. या कारणांमुळे घोटी परिसरात नववसाहतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे.

या नववसाहतींच्या गरजांची पूर्तता करतांना ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागते. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा त्यातीलच एक. हा प्रश्न सोडविण्यासाठी काही वर्षांपासून घोटीसाठी भावली धरणातून पाणी मिळावे यासाठी जलसपदामंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. तसेच घोटी पाणी प्रश्न भावली धरणातून पाणी योजना मंजूर होण्यासाठी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही पाठपुरावा केला होता.

टंचाईच्या काळात २० ते २५ हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावाची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून त्यादृष्टीने गावात भावली धरणातून पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी ग्रामपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. या प्रयत्नांना पाणी योजना मंजूर झाल्याने यश आले आहे. मंजुरीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.  यावेळी सरपंच गणेश गोडे, उपसरपंच अरुणा जाधव, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, संजय जाधव, रवींद्र तारडे, भास्कर जाखेरे यांच्यासह शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कुलदीप चौधरी आदी उपस्थित होते.

घोटी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून येथील पाणी  समस्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. ही पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी माजी ग्रामपालिका सदस्य संतोष दगडे, रामदास शेलार, सचिन गोणके, रामदास भोर, संजय आरोटे यांच्यासह सर्व सदस्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजुर झाली असून लवकरच गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ होईल.