अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत अंकुर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी या महोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांना जागतिक कीर्तीच्या माहितीपटकारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या वेळी ‘मॉलीवूड’वरही चर्चा रंगणार आहे.

याबाबतची माहिती अंकुर संयोजन समितीचे सदस्य रणजीत गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंकुरचे हे चवथे वर्ष आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने निर्मिलेल्या सामाजिक आशयाचे माहितीपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातात.

गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन शक्रवारी सायंकाळी पाच वाजता माहितीपट व चित्रपट निर्माती निष्ठा जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत थेट संवादाचा कार्यक्रम होईल.

या वेळी अंकुरच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘सिग्नेचर फिल्म’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी सहा वाजता होईल. या वेळी प्रसिद्ध माहितीपटकार आणि कलावंत शबनम विरमणी उपस्थित राहतील. या वेळी त्यांची पुरस्कारप्राप्त माहितीपट ‘हद-अनहद’ दाखविला जाणार आहे. त्यानंतर विरमणी यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात सहभागी झालेल्या माहितीपटाचे सादरीकरण २५ तारखेपासून दररोज सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात मालेगाव अर्थात मॉलीवूडवर सखोल चर्चा होणार आले.

सामान्य माणसाच्या समस्या आणि जाणिवा यांच्याशी निगडित हा महोत्सव असल्याचे अविनाश नेवे यांनी सांगितले. यात सामाजिक आशय असावा हे निश्चित करण्यात आले आहे.

आता हा महोत्सव देशपातळीवर पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्य़ांसह उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यातूनही माहितीपट सहभागी झाले आहेत.

या वेळी १०० प्रवेशिका आल्या असून त्यातील आशय व हाताळणी पाहून माहितीपट दाखविले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.