annasaheb more felicitated chief minister eknath shinde at the agricultural festival in nashik zws 70 | Loksatta

समर्थ सेवामार्गाकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम; कृषी महोत्सव समारोपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

येथील डोंगरे वसतिगृह मैदानात आयोजित कृषी महोत्सवाचा रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला.

annasaheb more felicitated chief minister eknath shinde
नाशिक येथे कृषी महोत्सवाच्या समारोपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रणेते अण्णासाहेब मोरे

नाशिक : समाजाप्रती असलेली बांधिलकी स्वामी समर्थ सेवामार्गाने सांभाळली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येईल. यादृष्टीने सरकारसह समर्थ मार्गासारख्या अनेक माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले

येथील डोंगरे वसतिगृह मैदानात आयोजित कृषी महोत्सवाचा रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब मोरे यांनी पारंपरिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्यांच्या उत्कर्षांसाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे सांगितले. सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रिबदू ठरवूनच काम करीत आहे. हे सरकार केवळ सत्तेवर बसलेल्या एका राजकीय पक्षाचे नाही तर राज्यातील प्रत्येक जनतेचे आहे. शेतकरी आणि जनतेला पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी सरकारचा नेहमीच प्रयत्न राहील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी समर्थ सेवामार्गातर्फे शेतकरी, समाज, राष्ट्रासाठी करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुक केले. सेंद्रिय शेतीचा नुसता मंत्र देऊन गुरुमाऊली थांबले नाहीत तर अडीच लाख शेतकरी या माध्यमातून जोडून त्यांना अधिक उत्पन्नाचा मंत्र दिला. साडेचारशे महिला बचतगट स्थापन करून हजारो भगिनींना तर हजारो युवकांना रोजगार दिला. एक लाख विवाह नोंदणी करून शेकडो युवकांचे विवाह सामुदायिक सोहळय़ात लावण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले.

माजी मंत्री तथा आ. बबन लोणीकर यांनी प्रास्ताविकात स्वामी समर्थ मार्गाने शेतकऱ्यांना अनेक मार्गाने मदत केली असल्याचे सांगितले. जनतेला लागणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य आदी सुविधा नाममात्र दरात स्वामी समर्थ मार्ग देत आला आहे. शेतकऱ्यांना केंद्रिबदू मानून सुरु झालेला हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

महोत्सवातील विविध दालनांना भेट देत मुख्यमंत्र्यांनी विक्रेत्यांशी हितगुज साधले. समारोपास सेवामार्गाचे प्रणेते अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे, आबासाहेब मोरे, पालकमंत्री दादा भुसे, तसेच संजय शिरसाठ, भरत गोगावले, सुहास कांदे, सीमा हिरे या आमदारांसह खा. हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 05:13 IST
Next Story
धनुषसह अतिप्रगत तोफा लवकरच संरक्षण दलात; स्वदेशी सामग्रीने तोफखाना दलाच्या आधुनिकीकरणाला वेग