मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांद्याच्या भावात गत सप्ताहाच्या तुलनेत २०० रुपयांची घसरण झाली. बाजार पेठेतील कांद्याची आवक स्थिर असून बाजार भावात मात्र घट होत आहे. लासलगाव बाजार समितीत मात्र क्विंटलला ३९ रुपयांनी घसरण झाली.

गेल्या सप्ताहात १६०० ते १७५० रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचे भाव होते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारभावात तुलनेत २०० रुपयांनी घसरण झाली. सोमवारी मनमाड बाजारात ३१४ ट्रॅक्टरची आवक झाली. त्यास ४०० ते १६७६ रुपये, सरासरी १५५० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. देशांतर्गत बाजारपेठेत मागणी कमी  झाल्याने बाजार भावात घट झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.  लासलगाव बाजार समितीत सोमवारी १६ हजार २१८ क्विंटलची आवक झाली. त्यास सरासरी १८३१ रुपये दर मिळाला. शनिवारच्या तुलनेत ३९ रुपये भाव कमी झाले. शनिवारी लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी १८७० रुपये भाव मिळाला होता.