कृषिमाल निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न

नाशिक : शेतात तयार झालेला माल निर्यात, प्रतवारी याकरिता शेतकरी बांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात कृषि विभागाच्या ३०० अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शासकीय योजना व या प्रशिक्षणाचा शेतकरी व महिला शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

पळसे येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन, लोकार्पण तसेच नाशिक हनी बी फार्मर प्रोडय़ूसर कंपनीच्या माध्यमातून साकारलेल्या गोडवा गुळ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.   खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी सुनिल वानखेडे, प्रकल्प संचालक, आत्मा राजेंद्र निकम, उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ वाघ, कृषी उपसंचालक, कैलास शिरसाठ, अध्यक्ष सह्याद्री फार्मर प्रोडय़ुसर कंपनी, विलास िशदे आदी यावेळी उपस्थित होते.

गटशेतीच्या माध्यमातून गुळ निर्मिती प्रकल्प उदयास आला असून या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहोचविणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सेंद्रीय शेती व फार्मर प्रोडय़ूसर कंपन्यांच्या सहकार्याने तरूण शेतकरी हे नक्कीच कारखानदार होतील. जुने तंत्रज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून उभारलेला गुळ निर्मिती प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रसायन विरहित शुध्द गुळ ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

शासनाकडून शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. यात विकेल ते पिकेल या योजनेद्वारे ज्या वाणास जास्त मागणी आहे. त्या वाणाचे पीक शेतकरी आपल्या शेतात घेण्यासाठी कृषी विभाग प्रोत्साहन देत आहे. त्यांनी उत्पादीत केलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना व फार्मर प्रोडय़ुसर कंपनी यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी बाजरपेठही उपलब्ध करून दिली जाते. महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने ३० टक्के योजना या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. बचतगट व गट शेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास साधावा असे भुसे म्हणाले.

यावेळी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात गव्हाचे हेक्टरी ६२१.० क्विंटल उत्पादन घेतल्याबद्दल अशोक टिळे, चायनिज भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे विश्वास कळमकर व गव्हाचे हेक्टरी ४७.६६ क्विटंल उत्पादन घेतल्याबद्दल शिवाजी म्हस्के यांचा समावेश आहे.