scorecardresearch

पुरातत्त्व विभागाची ‘स्मार्ट सिटी’ला नोटीस

जुने घाट तोडल्याने वाद;  अनेक रस्ते खोदण्यात आल्याने नाशिककरांच्या अडचणीत वाढ नाशिक : स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने शहरात स्मार्ट सिटी योजनेतंर्गत विविध कामे सुरू आहेत. वेगवेगळय़ा भागात रस्ते खोदण्यात आल्याने नाशिककरांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शनिवारी गोदाकाठावरील जुने घाट तोडण्याचे काम सुरु झाल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले. एकत्र येत त्यांनी काम बंद पाडले. या सर्व […]

स्मार्ट सिटी’ योजनेतील कामांतर्गत गंगापात्रातील जुने घाट तोडण्यात आले. स्थानिकांच्या विरोधानंतर हे काम थांबविण्यात आले. तोडलेल्या घाटांची पाहणी करताना पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक आरती आळे.

जुने घाट तोडल्याने वाद;  अनेक रस्ते खोदण्यात आल्याने नाशिककरांच्या अडचणीत वाढ

नाशिक : स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने शहरात स्मार्ट सिटी योजनेतंर्गत विविध कामे सुरू आहेत. वेगवेगळय़ा भागात रस्ते खोदण्यात आल्याने नाशिककरांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शनिवारी गोदाकाठावरील जुने घाट तोडण्याचे काम सुरु झाल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले. एकत्र येत त्यांनी काम बंद पाडले. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी पुरातत्त्व विभागाच्या वतीने गोदाकाठची पाहणी करण्यात आली. जुने घाट तोडण्यात आल्याने विभागाने नाराजी व्यक्त केली असून स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला नोटीस देण्यात आली आहे.

शहर परिसरात स्मार्ट सिटी कामांचा आधीच बोजवारा उडाला आहे. त्यांच्या कामांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. काहींच्या प्राणावर बेतले असताना कंपनीने आता गोदाकाठाकडे मोर्चा वळवला आहे.  गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगण परिसरातील जुन्या घाटाच्या फरश्या तोडण्याचे काम स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराकडून शनिवारी सुरू करण्यात आले. ठेकेदाराने ३०० ते ४०० हून अधिक फरश्या तोडल्या. याच परिसरात नीलकंठेश्वर महादेव मंदिर, मारूती मंदिरासह अन्य मंदिरे आहेत.

यापैकी काही मंदिरे जमीनदोस्त करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी करत काम बंद पाडले. याबाबत गोदावरी नागरी सेवा समितीच्या वतीने पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक आरती आळे यांना निवेदन देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी

आरती आळे आणि इतर अधिकाऱ्यांनी गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांच्या समवेत गोदाकाठाची पाहणी केली. नीळकंठेश्वर मंदिर राज्य संरक्षित वास्तु असतांना या ठिकाणी काम करतांना स्मार्ट सिटीच्या वतीने कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. फरश्यांची तोडफोड करण्यात आल्याने संबंधित विभागाकडून स्मार्ट सिटीकडे खुलासा मागविण्यात आला आहे.

निकषांचे पालन करावे

गोदाकाठावरील नीळकंठेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित वास्तू आहे. येथील फरशा सुस्थितीत होत्या. त्या तशाच ठेवत काम करता आले असते.  गोदाकाठावरील ओटय़ांचे काम करताना स्मार्ट सिटीने कुठलीही परवानगी घेतली नाही. फरश्या सुस्थितीत असताना ते तोडण्याचे काम काय? असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सध्या काम थांबलेले असून पुढील काम करताना पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित वास्तूशी संबंधित दिलेल्या निकषांचे पालन करावे. याबाबत कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.

– आरती आळे  (साहाय्यक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग)

गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचा आक्षेप 

नीळकंठेश्वर मंदिर राज्य संरक्षित वास्तू असताना या ठिकाणी काम करताना आवश्यक खबरदारी घेतली न गेल्याने मंदिराना भेग पडली आहे. याशिवाय अन्य नुकसान झाले. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या वतीने या सर्व पार्श्वभूमीवर  हे काम करताना तोडफोड करण्यापूर्वी आणि बांधकामासाठी स्मार्ट सिटीने पुरातत्त्व विभाग संचालक तसेच वस्तुसंग्रहालय विभाग यांची परवानगी घेतली होती का , असा प्रश्न उपस्थित केला. प्रतिबंधित क्षेत्रात फरशा बसविण्याचे काम सुरू आहे. ते काम थांबविण्यात यावे, भग्न अवस्थेतील पुरातन पायऱ्या, मंदिर आणि मूर्ती मूळ स्वरूपात पुनरुज्जीवित करण्यासाठी तात्काळ स्मार्ट सिटीला जबाबदारी द्यावी, संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समितीचे देवांग जानी यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Archaeological department issues notice smart citydisputes breaking old ghatsysh

ताज्या बातम्या