नाशिक – लष्करी हवाई दलाकडे अपाचीसह अन्य आधुनिक हेलिकॉप्टर तसेच अचूक लक्ष्यभेदाची क्षमता असणारे एमक्यू –९ रिपरसारखे ड्रोनही समाविष्ट होत आहे. आधुनिक सामग्रीने लष्करी क्षमता कमालीची विस्तारणार असली तरी यु्द्धात विजय प्रगत सामग्रीच्या आधारे मिळतो की, तिचा वापर करणाऱ्यांमुळे यावर कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलच्या दीक्षांत सोहळ्यात लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी प्रकाशझोत टाकला.

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्सचा) दीक्षांत सोहळा शुक्रवारी लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ धीरज सेठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या निमित्ताने आर्मी एव्हिएटर्स, आर्मी हेलिकॉप्टर प्रशिक्षक (इस्ट्रक्टर) आणि पहिल्या संयुक्त अंतर्गत वैमानिक व निरीक्षक (कम्बांइन इंटर्नल पायलट ॲण्ड ऑब्झर्व्हर) या शिक्षणक्रमातील अधिकारी एकाचवेळी उत्तीर्ण झाले. एव्हिएशन स्कूलचा असा पहिलाच एकत्रित पदवीदान सोहळा होता. एकात्मिक प्रशिक्षणामुळे लष्करी सेवेत सुरुवातीपासून अखंड समन्वय प्रस्थापित होईल, असा विश्वास व्यक्त झाला. देशात स्थापन होणाऱ्या एकात्मिक युद्ध विभागांतर्गत (थिएटर कमांड) केवळ सामाईक लष्करी कारवाईच नव्हे, तर संयुक्त प्रशिक्षणही अंतर्भूत आहे. त्या दिशेने स्कुलने पाऊल टाकले.

यावेळी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना युद्धभूमीच्या वेगाने बदलणाऱ्या स्वरुपाकडे लक्ष वेधले. मानवरहित प्रणाली, अचूक क्षमता आणि प्रगत टेहळेणीने युद्धभूमीवर प्रभावी कामगिरी परिभाषित होत आहे. गुंतागुंतीच्या भूभागात सामरिक गतिशीलता, शस्त्रसामग्री वितरण आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर अपरिहार्य आहेत. भविष्यातील युद्धात हेलिकॉप्टरचे लढाऊ वैमानिक आणि वैमानिकरहित विमानांच्या (आरपीएएस) वैमानिकांची महत्वाची भूमिका असणार आहे. कारवाईत एकत्रित क्षमता शक्ती विस्तारतात. कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलने मानवयुक्त व मानवरहित लष्करी सामग्रीचे एकत्रीकरण, लष्करी क्षमतांची एकत्रित वापराची वाढती गरज आणि उदयोन्मुख कारवाईच्या गरजेनुसार जलदपणे जुळवून घेतल्याबद्दल सेठ यांनी समाधान व्यक्त केले.

लष्करी हवाई दलाकडे आधुनिक हेलिकॉप्टर तसेच अचूक लक्ष्यभेदाची क्षमता असणारे एमक्यू –९ रिपरसारखे ड्रोनही समाविष्ट होत आहे. आधुनिक सामग्रीने क्षमता विस्तारत असली तरी लढाई यंत्र (मशीन) जिंकत नाहीत. तर ती हेलिकॉप्टर व मानवरहित विमाने चालविणाऱ्या वैमानिकांचे (म्हणजे यंत्र चालविणारे) कौशल्य, निर्णय आणि दृढनिश्चय यावर जिंकली जाते, असे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी अधोरेखीत केले.

प्रात्यक्षिकात रणगाडेही

सोहळ्यात युद्धभूमीवरील कारवाईची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. यामध्ये हलक्या वजनाचे ध्रुव, हल्ला चढविण्याची क्षमता असणारे रुद्र, चेतक, चिता हेलिकॉप्टर्स आणि मानवरहित विमाने, ड्रोनने सहभाग घेतला. स्कूलने या प्रात्यक्षिकांचे स्वरुप पूर्णत बदलले. हेलिकॉप्टर्स व मानवरित विमाने, हेक्झाकॉप्टरचा मोठा ताफा सहभागी केला. शिवाय प्रात्यक्षिकात पहिल्यांदाच रणगाडे उतरवले. लष्करी हवाई दल सैन्यासमवेत शस्त्र सामग्री, दारुगोळा पोहोचवण्यापासून ते युद्धभूमीवरील जखमींना सुखरुपपणे नेण्यापर्यंत कोणकोणती कारवाई करते, त्याचे दर्शन घडविले गेले.