परस्परविरोधी तीन गुन्हे दाखल

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे संतप्त पडसाद मंगळवारी शहरात उमटले होते. यावेळी दगडफे क प्रकरणी सेना-भाजप कार्यकर्त्यांनी परस्परांविरुध्द दाखल तक्रारीनुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले. १० जणांना ताब्यात घेण्यात आले.  संशयितांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर तर, भाजपच्या मुके श सहाणे यांचा समावेश आहे. या दोघांसह अनेक संशयित गायब आहेत.

केंद्रीयमंत्री राणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर सेना-भाजपमधील वाद शिगेला पोहोचला. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत विजय कुलकर्णी यांनी तक्रार दिली. सेनेचे नगरसेवक दीपक दातीर, पदाधिकारी बाळा दराडे आणि पाच ते सहा कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी, शिवीगाळ केली. दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चारुदत्त आहेर यांनीही शिवसैनिकांविरुध्द वेगळी तक्रार दिली आहे.

पक्ष कार्यालयाची पाहणी करीत असताना संशयित महेंद्र बडवे, वैभव खैरे, दिगंबर मोगरे आदी १५ ते २० शिवसैनिक लाठ्या, काठ्या घेऊन भाजप कार्यालयावर चाल करुन आले. घोषणाबाजी केली. सार्वजनिक शांततेचा भंग करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या दोन्ही तक्रारीनुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. शिवसेनेकडून भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुध्द तक्रार देण्यात आली. अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांनी ही तक्रार दिली. त्यानुसार भाजप नगरसेवक मुकेश सहाणे, अनिकेत सोनवणे, अमित  घुगे आदी ७५ ते १०० कार्यकर्ते कुदळ, फावडे घेऊन शिवसेना कार्यालयासमोर जमले. दगडफेक, सोड्याच्या बाटल्या फेकल्या. शिवसैनिकांना शिवीगाळ करून धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक सहाणे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी १० शिवसैनिकांची धरपकड केली होती. भाजपचे सहाणे आणि शिवसेनेचे दातीर यांच्यासह अनेकांना अद्याप अटक झालेली नाही. त्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

सेना नगरसेवक कसे सापडत नाहीत ?

भाजप कार्यालयावरील दगडफेकीच्या घटनेला २४ तास उलटले आहेत. तरीदेखील सेनेचे नगरसेवक दीपक दातीर आणि अन्य संशयित कसे सापडले नाहीत, असा प्रश्न बुधवारी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये यांची भेट घेऊन उपस्थित केला. दगडफेक करणारे संशयित नगरसेवक मुंबई आणि परिसरात लपल्याचा अंदाज आहे. केंद्रीयमंत्री राणे यांच्याविरुध्द सेना पदाधिकाऱ्यांनी फलकबाजी केली आहे. मंत्र्यांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे खासदार संजय राऊत यांच्याविरुध्द कारवाईची मागणी करण्यात आली. पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे. भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांना त्वरित अटक करून कठोर कारवाईची मागणी आ. देवयानी फरांदे, अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यासह शहर पदाधिकाऱ्यांनी केली.