क्षयरुग्णांना उपचारावेळी पोषण आहार मिळाला नाही, तर उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसत नाही. त्यामुळे क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी राबविलेल्या निक्षय मित्र उपक्रमांतर्गत पेठ तालुक्याचे पालकत्व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्वीकारले आहे. जिल्ह्यात निक्षय मित्र होण्याच्या त्या पहिल्या मानकरी ठरल्या असून आतापर्यंत १७ निक्षय मित्रांची नोंदणी झाली आहे. त्यांच्या मदतीने ३५० उपचाराधिन क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची व्यवस्था झाली आहे. जिल्ह्यात क्षयरोगाचे १८९८ उपचाराधिन रुग्ण असून उर्वरित दीड हजार रुग्णांच्या पोषण आहारासाठी निक्षय मित्रांचा शोध घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मालेगावमध्ये ओला दुष्काळ आढावा बैठक; शेतकऱ्यांकडून विमा कंपन्यांविरोधात तक्रारींचा पाऊस

२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी निक्षय मित्रांची मदत घेतली जाणार आहे. पोषक आहार नसणाऱ्या व्यक्तींना क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक असते. या आजाराच्या रुग्णांना किमान सहा महिने औषधोपचार घ्यावा लागतो. त्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाने व्यवस्था केलेली आहे. या रुग्णांना शासनाकडून ५०० रुपये महिना म्हणजे सहा महिन्यांसाठी तीन हजार रुपये आहार भत्ता दिला जातो. अशा व्यक्तींना उपचार कालावधीत सकस आहार देण्यासाठी केंद्र सरकारने प्रौढ व्यक्ती, लहान मुलांसाठी दोन वेगवेगळ्या पर्यायात पोषण आहार निश्चित करून दिला आहे. संबंधितांना उपचार कालावधीत नियमित स्वरुपात अतिरिक्त आहार देण्यासाठी निक्षय मित्र उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. त्या अंतर्गत क्षय रुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी घेण्यात सामाजिक सहभाग वाढविला जात आहे. पेठ तालुक्यात उपचाराधिन ८८ रुग्ण आहेत. त्यातील १० जणांच्या पोषण आहाराची जबाबदारी डाॅ. भारती पवार यांनी स्वीकारल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी मोहंमद तुराबअली देशमुख यांनी सांगितले. निक्षयमित्र उपक्रमात आतापर्यंत १७ जणांनी नोंदणी केली आहे. त्यातून ३५० रुग्णांच्या अतिरिक्त पोषण आहाराची व्यवस्था झाल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा- शिक्षक गायब, विद्यार्थीच शिक्षकांच्या भूमिकेत…प्रकरण नेमके काय आहे?

उपचाराधीन दीड हजारहून अधिक क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची व्यवस्था होणे अद्याप बाकी आहे. त्यासाठी या उपक्रमात जिल्ह्यातील उद्योगसमूह, सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. इच्छुकांनी आभासी प्रणालीच्या माध्यमातून निक्षय मित्रसाठी नोंदणी करून क्षयरुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

उपचाराधिन १८९८ रुग्ण

जिल्ह्यात सद्यस्थितीत १८९८ उपचाराधिन क्षयरुग्ण आहेत. ग्रामीण भागात क्षयरोगाचे प्रमाण अतिशय कमी आहे. रेल्वे मार्गावरील मनमाड, इगतपुरीसारख्या भागात तुलनेत अधिक रुग्ण आढळतात. इतर भागात एक लाख लोकसंख्येला ४० रुग्ण आढळतात.

सर्वेक्षणात ८० नवे रुग्ण

नव्या क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी १३ सप्टेंबरपासून ग्रामीण भागात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २२ लाख २५ हजार २८२ म्हणजे ५६ टक्के लोकसंख्येची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात १२ हजार १८४ संभावित रुग्ण आढळले. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ८० नव्या रुग्णांचे निदान झाल्याचे जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrangement of nutrition for 350 tuberculosis patients in nikshay mitra initiative in nashik dpj
First published on: 23-09-2022 at 13:52 IST