एक गट परस्पर आयुक्तांना भेटल्याने वादाची ठिणगी

नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या महाकवी कालिदास नाटय़मंदिराच्या भाडेवाढीबाबत महापालिका प्रशासन आग्रही असले, तरी लोकप्रतिनिधींची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच भाडेवाढीसह अन्य मुद्दय़ांवरून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद विरुद्ध अन्य कलावंत अशी फूट पडली असून गुरुवारी त्याचा स्वर कलामंदिरात आळवला गेला. कलावंतांचा एक गट परस्पर आयुक्तांना भेटल्याने वादाची ठिणगी पडली.

कलामंदिराची भाडेवाढ होणार असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितल्यानंतर कलामंदिराच्या भाडेवाढीमुळे व्यावसायिक तसेच हौशी रंगकर्मीसमोर निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा सुरू झाली. आकारण्यात येणारे भाडे परवडण्यासारखे नाही, असा दावा कलावंतांकडून करण्यात येत असताना महापालिका प्रशासन कलामंदिराच्या देखभालीसाठी भाडेवाढ गरजेची आहे, या मुद्दय़ावर अडून आहे. भाडेवाढ निश्चितीविषयी स्थायी समिती निर्णय घेणार आहे.

दुसरीकडे केवळ भाडेवाढीच्या मुद्दय़ावरून कलावंतांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भाडेवाढीच्या मुद्दय़ावर कलावंतांनी एकत्र येत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्याचे ठरले असताना कलावंतांचा एक गट नाटय़ परिषदेला बाजूला ठेवून आयुक्तांना जाऊन भेटल्याने कलावंतांमध्ये वाद निर्माण झाला आहे.  कलावंतांच्या एका गटाने गुरुवारी कलामंदिरात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. भाडेवाढीतून हौशी, व्यावसायिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना वगळण्यात यावे, कापरेरेट कंपन्यांना भाडेवाढ कायम ठेवावी, कॅनरा कंपनीचे स्पॉट लावणे, विंग दुरुस्ती, एलईडी दुरुस्तीची मागणी करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय नाटय़ परिषद नियामक मंडळ सदस्य सचिन शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, विनोद राठोड उपस्थित होते. याबाबत लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा उपस्थितांनी दिला.

आयुक्तांच्या भेटीनंतर आजच्या पत्रकार परिषदेविषयीही अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेला अंधारात ठेवण्यात आले. कलावंतांच्या प्रश्नांवर दाद मागितली जात असेल, तर चांगले आहे, परंतु यात राजकारण नको असा सूचक सल्ला नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिला.

वाद कुठे ?

कालिदास कलामंदिर किंवा अन्य कुठल्याही मुद्दय़ांवरून कलावंतांमध्ये फूट नाही. मी नियामक मंडळाचा सदस्य असल्याने नाटय़ परिषदेला सोबत घेतले नाही असे नाही. आम्ही भाडेवाढीच्या मुद्दय़ावर सर्व कलावंतांच्या वतीने दाद मागत आहोत. भाडेवाढ नको यावर कलावंत ठाम असताना वाद कुठे ? नाटय़ परिषदेतील काही राजकीय मंडळी या विषयाचे भांडवल करत आहेत.

– सचिन शिंदे, अखिल भारतीय नाटय़ परिषद, नियामक मंडळ सदस्य