नाशिक – जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यावर प्रभावी प्रतिबंध आणि लवकर निदान करण्याच्या उद्देशाने ‘अरुणोदय’ ही विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ही विशेष मोहीम राबवून एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे.

सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्तपेशीशी संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात; तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्तपेशी रक्त वाहिन्यांतून सरळ निघून जातात. परंतु, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. त्याला ‘सिकलसेल क्रायसिस’ म्हणतात. यामुळे असह्य वेदना होतात. अशी इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होतो.

नष्ट झालेल्या रक्तपेशी जमा होतात, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी अडकल्यामुळे प्लीहेवर जबरदस्त सूज येते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळे आजाराविरुद्धची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आजाराचे प्रमाण अधिक वाढते. ज्या-ज्या भागात रक्त पुरवठा खंडित होतो, त्या-त्या भागातील अवयवांना इजा होत असते. त्यामुळे सिकलसेल रुग्णांची हाडे, फुफ्फुस, यकृत, प्लीहा, मेंदू प्रामुख्याने बळी पडून आजारांची गंभीरता वाढल्याने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हे सर्व नकळत होऊन उपचाराला वेळ मिळत नाही. याशिवाय, डोळे, स्वादुपिंड, त्वचा, पित्ताशयही प्रभावित होऊ शकतात.

हा आजार होऊ नये यासाठी जोडप्याने सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा. लाल आणि पिवळे कार्ड असलेल्यांनी आपआपसात विवाह टाळावा. सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा. सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. सिकलसेल रुग्णांना नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे. सिकलसेल रुग्णाचे योग्य औषधोपचाराने आयुष्य वाढते. सिकलसेलग्रस्त रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणीची आवश्यकता असते. फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घेणे. सोडामिंटच्या गोळ्यांचे सेवन महत्वाचे असते. भरपूर पाणी पिणे (दररोज ८ ते १० ग्लास), वेदनाशामक गोळ्या, नियमित तपासणी व सल्ला घेणे. गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे. सिकलसेल रुग्णांनी आहारात विविधता ठेवावी. दिवसातून तीन वेळा आहार घ्यावा. मासे, अंडी, संत्री, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, शेंगा, झिंक असलेले पदार्थ खावेत, बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन करून हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो.

सिकलसेल रुग्णांनी दररोज १० ते १५ ग्लास पाणी प्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घ्याव्यात. समतोल आहार, नियमित तपासणी आणि योग्य काळजी घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. – डॉ. चारुदत्त शिंदे (जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक)

सिकलसेलचे वाहक आणि रुग्ण असे दोन प्रकार असतात. वाहक व्यक्तीमध्ये लक्षणे नसली तरी ते पुढील पिढीला हा आजार देऊ शकतात. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत समुपदेशन, सोल्युबिलिटी चाचणी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत. नागरिकांनी विशेषतः ताप, सांधेदुखी किंवा वारंवार कावीळ होत असल्यास त्वरित तपासणी करावी. – डॉ. सुधाकर मोरे ( जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक)