नाशिक – त्या चार दिवसांमधील महिलांची अडचण दूर व्हावी, त्या चार दिवसात कपड्याचा वापर न करता पर्यावरणपूरक अशा मासिक पाळी कपचा वापर करावा, यासाठी येथे आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय संघटनांच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. यासाठी नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करतांना तळागाळातील महिलांपर्यंत हा कप जावा, त्यांना त्याचा वापर सहज करता यावा, यासाठी आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात यासाठी तीन हजार कपची खरेदी करण्यात आली आहे.
गुरूवारी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थिती या उपक्रमास आरंभ झाला. आरोग्य विभागाची साखळी असलेल्या आशा कार्यकर्त्या या ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांच्या थेट संपर्कात असतात. यासाठी त्यांची निवड करुन त्यांना या उपक्रमाविषयी प्रशिक्षण देत मासिक पाळी कप वापरासाठी ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
नाशिक स्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. नेहा लाड आणि डॉ. गौरी करंदीकर, एचएलएल लाईफकेअरच्या डॉ. राजश्री दिवेकर यांनी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले. पुढील टप्प्यात तालुकानिहाय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षण सत्रानंतर प्रत्येक आशा सेविकेला, कार्यकर्तीला मासिक पाळी कप वितरित करण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार मासिक पाळी कप जिल्हास्तरावरून सेसमार्फत खरेदी करुन देण्यात आले आहेत. मासिक पाळी कप वितरित झाल्यानंतर आशा कार्यकर्तींना मार्गदर्शन करण्यासाठी दूरध्वनी प्रणालीद्वारे संपर्क व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व लाभार्थीचे वेळोवेळी अभिप्राय देखील नोंदविण्यात येणार आहेत. याच आशा ग्रामीण भागातील, आपल्या कार्यक्षेत्रातील जीकिशोरवयीन मुली आणि महिलांना मासिक पाळी कप वापरासंदर्भात प्रशिक्षण व जनजागृती करण्याची भूमिका पार पाडतील.