धुळे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर खान्देश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील भाविकांच्या सोयीसाठी सुरत–नंदुरबार–दोंडाईचा–अमळनेर–जळगाव मार्गे पंढरपूर यात्रा विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी दोंडाईचा परिसरातील विविध सामाजिक, व्यापारी, धार्मिक आणि राजकीय संघटनांनी केली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले असून पाच जुलै ते पाच ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील दोंडाईचा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून या परिसरातील प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून विविध रेल्वे सुविधांसाठी पाठपुरावा करीत आहेत असा दावा करण्यात आला आहे. यंदा आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी येत असल्याने पंढरपूर यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविक दरवर्षी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येथे जातात. यात्रेच्या काळात राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बससेवा उपलब्ध करून दिली जात असली तरी वाढत्या गर्दीमुळे अनेक भाविकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

विशेष म्हणजे, खान्देश परिसरातून पंढरपूरकडे थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने भाविकांना मनमाड, दौंड किंवा पुणे मार्गे अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, खर्च आणि गैरसोय वाढते. सुरत–नंदुरबार–दोंडाईचा–अमळनेर–जळगाव मार्गे विशेष रेल्वे सुरू झाल्यास भाविकांना थेट पंढरपूर गाठणे सुलभ होईल. तसेच रेल्वे मार्गावरील स्थानकांमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी लाभ घेऊ शकतील. यात्रेच्या काळात रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत मिळेल, असे मत मागणीकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

या पार्श्वभूमीवर सुरत–नंदुरबार–दोंडाईचा–अमळनेर–जळगाव मार्गे

पंढरपूर विशेष रेल्वे सुरू केल्यास हजारो भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास उपलब्ध होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ही रेल्वे सेवा केवळ यात्रेपुरती मर्यादित न ठेवता भविष्यात नियमित अथवा कायमस्वरूपी सुरू करण्याचाही सकारात्मक विचार रेल्वे प्रशासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. खान्देशातून रेल्वे मार्गे थेट सेवा उपलब्ध झाल्यास केवळ यात्रेकरूच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांनाही मोठा लाभ होईल. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवेची मागणी ही केवळ हंगामी नसून दीर्घकालीन सार्वजनिक गरज असल्याचे मत विविध संघटनांनी व्यक्त केले आहे.

या मागणीमुळे खान्देशसह गुजरात आणि मध्य प्रदेशातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, ही मागणी दोंडाईचा प्रवासी व व्यापारी संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब, जायंट्स ग्रुप, विविध पत्रकार संघटना, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटना तसेच दोंडाईचा परिसरातील नागरिक यांच्या संयुक्त वतीने करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने भाविकांच्या भावना आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.