scorecardresearch

भाजपकडून दहशतवादाला खतपाणी – अशोक चव्हाण

मालेगाव स्फोटप्रकरणी केलेला तपास योग्य असल्याचा दावा

भाजपकडून दहशतवादाला खतपाणी – अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंहसह सहा जणांना आरोपमुक्त करण्याची भाजप सरकारची कृती दहशतवादाला खतपाणी घालणारी असल्याचा आरोप करत देशासाठी ही अतिशय धोकादायक बाब असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २००८ सालच्या मालेगाव स्फोटप्रकरणी केलेला तपास योग्य असल्याचा दावा आजवर दावा करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घूमजाव करत याप्रकरणी मुख्य संशयित प्रज्ञा सिंह आणि अन्य पाच संशयितांना आरोपमुक्त ठरवणारे पुरवणी आरोपपत्र विशेष न्यायालयात सादर केले. या घडामोडींबाबत मतप्रदर्शन करताना चव्हाण यांनी भाजप सरकार एनआयएसारख्या तपास यंत्रणांवर दबाव आणत असल्याची तक्रार केली. या कृतीमुळे चुकीचा संदेश जात आहे. एटीएसने केलेला तपास भाजप सरकार सत्तेवर आल्यावर कसा बदलला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, राज्य शासनाची पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा फसवी असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतरही संबंधित कुटुंबीयांच्या डोक्यावर कर्ज कायम आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजप सरकार कोणताही निर्णय घेत नाही.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी संपूर्ण कर्ज माफी हा एकच उपाय असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. काँग्रेसतर्फे शनिवारीकळवण येथे आदिवासी वनहक्क व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकार आदिवासींच्या अधिकारांवर गदा आणण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला.

मालेगावात निषेध
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंहसह सहा जणांना आरोपमुक्त करण्याबरोबर इतर सर्व संशयितांचा मोक्का हटविण्याच्या निषेधार्थ मालेगाव येथे काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आ. असिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. एनआयए राजकीय दबावाखाली काम करत असून भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याची टिका आंदोलकांनी केली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-05-2016 at 00:05 IST

संबंधित बातम्या