Ashok Kharat Bhondubaba Onion Scam – अनेक मंत्री आणि सर्वपक्षीय बड्या पदाधिकाऱ्यांशी निकटचे संबंध राखणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातने व्यंकटेश्वर आणि ईशानेश्वर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करीत नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन कांदा, मका खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटनेने श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली तक्रार भोंदूबाबा खरातच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडे पाठवली गेली आहे.
दर स्थिरीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करते. नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत ही खरेदी केली जाते. ही खरेदी बाजार समितीऐवजी खरेदी केंद्रातून, व्यापाऱ्यांकडून केली जात असल्याचा कांदा उत्पादकांचा आक्षेप आहे. या खरेदीत भोंदूबाबा अशोक खरातच्या कंपन्यांचाही सहभाग असल्याकडे स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटनेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी लक्ष वेधले.
खरातने बनावट कंपन्या स्थापन केल्या. नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कांदा, सोयाबीन खरेदीची कामे पदरात पाडून घेतली. २०२१ पासून त्याचा हा खेळ सुरू होता. मुळात दर स्थिरीकरण योजनेत शेतकऱ्यांना काहीअंशी लाभ होईल, हा उद्देश आहे. परंतु, संबंधित कंपन्या व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करतात. सोयाबीन खरेदीत ५३८० रुपयांचा भाव असताना व्यापाऱ्यांनी चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केली. नंतर हाच माल नाफेड व एनसीसीएफला विकून क्विंटलला १२०० ते १३०० रुपयांचा मलिदा लाटला गेला, असा आरोप शेडके यांनी केला.
केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत कांदा खरेदीत भोंदूबाबाने बनावट कंपन्या स्थापून घुसखोरी करत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याची तक्रार संघटनेने श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्याकडे दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शेडगे यांच्यासह महिला आघाडीच्या सुनीताताई वानखेडे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, रवी वानखेडे, श्रीराम त्रिवेदी, मधू काकड, मयूर भनगडे आदी उपस्थित होते. सिन्नर व निफाड येथील पत्ता दाखवून भोंदूबाबा खरातने व्यंकटेश्वरा व ईशानेश्वर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. कांदा खरेदीचे काम मिळवून नंतर ते उपकंपन्यांना दिले. ही तक्रार एसआयटीकडे पाठविण्यात आली असून सरकार आणि विशेष तपास पथक शेतकऱ्यांना न्याय देईल, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
फसवणूक कशी ?
श्री व्यंकटेश्वर फार्मस प्रोड्युसर ही अशोक खरातची कंपनी आहे. ७० कोटींची उलाढाल ,पण नफा केवळ आठ हजार रुपये दाखवण्यात आला आहे. व्यंकटेश्वर, ईशानेश्वर व्यतिरिक्त आठ ते नऊ कंपन्या आहेत. इतर काही शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये भोंदूबाबा खरात संचालक आहे. कांदा खरेदीशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मागील ती वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल सादर सादर केलेले नाही. कांदा खरेदी केल्यावर शेतकऱ्यांचा सात बारा व गट क्रमांक देण्याऐवजी केवळ सात बारा इतकीच नोंद केल्याचे दिसून येते. या प्रकारे भोंदूबाबाने कांदा उत्पादकांना गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
