नाशिक – संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसांपासून चर्चेचा विषय झालेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नव्या घडामोडी घडत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष पथकाकडून (एसआयटी) खरातविरुध्दच्या काळ्या कारनाम्यांविषयी पुरावे गोळा करण्यासह त्याला साथ देणाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

असे असले तरी अद्याप या चौकशीची व्याप्ती मर्यादित स्वरुपाची असल्याचा आक्षेप विरोधकांकडून घेतला जात असताना विशेष तपास पथकासाठी धक्कादायक अशी घडामोड नाशिकमध्ये घडली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहत आहेत.

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष असलेल्या अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह काही शेतकरी, जमीन मालक, गुंतवणूकदारांनाही फसविले असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे हे प्रकरण वेगवेगळे वळण घेत आहे. प्रारंभी केवळ महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा असलेल्या प्रकरणात दररोज नवनवीन विषयांची भर पडत आहे. खरातबरोबरच त्याचे नातेवाईक, त्याचे कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात येत आहे.

शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातविरुध्दही गुन्हा दाखल असल्याने तिला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक नाशिक येथील त्यांच्या घरी गेले असता ती पथकाच्या हातावर तुरी देत पसार झाली. परंतु, त्याचवेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. एसआयटीकडून त्याची चौकशी करण्यात आली. परंतु, या चौकशी दरम्यान हर्षवर्धन फारच त्रोटक माहिती देत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. चौकशी करुन त्यास सोडून देण्यात आले.

एसआयटीकडून हर्षवर्धन खरातला सोडण्यात आले असले तरी गरज भासेल त्यानुसार त्याची पुन्हा चौकशी होणे निश्चित होते. परंतु, नंतर हर्षवर्धन खरातच्या मुलाचा फोनच लागत नसल्याचे आढळून आले. हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आल्यावर तपास यंत्रणांनी खरातच्या नाशिक येथील निवासस्थानी शोध घेतला असता हर्षवर्धन घरीही नसल्याचे आढळले. त्यामुळे हर्षवर्धन खरात नेमका गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हर्षवर्धनचा ठावठिकाणा समजत नसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

हर्षवर्धन खरात नाशिकमध्येच आहे की, नाशिकबाहेर कुठे गेला, याविषयी तपास सुरु करण्यात आला आहे. हर्षवर्धनने नाशिक शहरातून बाहेर जाण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु, कोणत्याही नियमांचे पालन न करता, अधिकाऱ्यांशी संपर्क न करताच हर्षवर्धन कुठे गेला, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. हर्षवर्धनचा मोबाईल नाॅट रिचेबल असल्याने तो कुठे गेला, तो एकटाच बाहेर गेला की, त्याला कोणाची साथ आहे, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, खरातची पत्नी याआधीच फरार झाली आहे. आता खरातच्या मुलाशीही संपर्क होत नसल्याने नेमके झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.