नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या दलाल म्हणून कार्यरत होत्या. पीडित महिलांच्या अश्लील चित्रफिती समाज माध्यमात येत असतांना या प्रकरणात अडकलेल्या चाकणकर आणि त्यांच्या कुटूंबियांच्या चित्रफिती समोर आणा, चाकणकर यांना सहआरोपी करा, अशी मागणी झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली ठोंबरे यांनी केली.

खरात प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची शुक्रवारी रुपाली ठोंबरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर ठोंबरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खरात प्रकरणात इतरांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव चाकणकरांनी आणला होता. या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडे ज्या महिला आपल्या तक्रारी घेऊन जात होत्या. त्यांची भेट चाकणकर यांनी घेतली.

त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्या महिलांना तुमचे ग्रह, तारे बघितले का, पत्रिका पाहिली का, अशी विचारणा करुन चाकणकर त्या महिलांना खरात याच्याकडे पाठवत होत्या. खरात याला अटक झाल्यानंतर अनेक पीडितांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधला. खरातच्या अत्याचाराचा पाढा वाचला. या प्रकरणात चाकणकर या दलाल म्हणून कार्यरत होत्या. प्राथमिक माहितीनुसार ही साखळी चाकणकर चालवत होत्या. या प्रकरणात चाकणकर यांना सहआरोपी करा, अशी मागणी ठोंबरे यांनी केली.

पीडित महिलांच्या चित्रफिती समोर येत आहेत. पीडितेची, तिच्या कुटूंबाची ओळख उघड होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आजपर्यंत चाकणकरांची चौकशी का केली नाही. त्यांच्याकडे चाकणकर यांच्या कुटूंबाशी संबंधित चित्रफिती आहेत का, याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मूल न होणाऱ्या महिला खरातकडे गेल्यानंतर अनेकांना मुले झाली. खरात प्रकरण समोर आल्यावर अशा कुटूंबातील पती-पत्नींमधील वाद विकोपाला गेले आहेत. घटस्फोटाची संख्या वाढत आहे. या सर्व प्रकाराला खरात आणि चाकणकर जबाबदार आहे. पीडितांच्या चित्रफिती राज्यात सर्वदूर पोहचल्या. परंतु, पोलिसांकडे त्या उशीरा पोहचल्या.

महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी, दोन महिन्यांपूर्वीच या प्रकाराची माहिती मिळाली होती, असे सांगितले होते.ग त्याच वेळी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल झाला असता तर कित्येकांचे संसार वाचले असते. गुन्हा दाखल करण्यापेक्षा आर्थिक तडजोड करण्याकडे कल राहिल्याने पीडितांची संख्या वाढली, असा आरोप ठोंबरे यांनी केला. या वेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.