नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. खरात प्रकरणाचे निमित्त साधत आपल्या राजकीय विरोधकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्नही राज्य पातळीवर होतांना दिसत असून खरातचे मूळ गाव ज्या सिन्नर तालुक्यातील आहे, त्या सिन्नरचे राजकारणही यापासून दूर राहिलेले नाही. या विषयावरुन सिन्नर तालुक्यातील भाजपचे युवा नेते उदय सांगळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे या राजकीय विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केल्याने सिन्नरचे राजकारण ढवळून निघाले आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष असलेल्या भोंदू अशोक खरातचे काळी कृत्य उघडकीस आली. आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक खळबळ उडाली. खरताच्या संस्थानशी संबंधित श्री ईशान्येश्वर मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने बडे राजकीय नेते अशोक खरातकडे आपले राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते, हे आता उघड झाले आहे. खरात प्रकरणाने राज्याचे राजकारण हादरले असताना खरातच्या सिन्नर तालुक्यात राजकीय पातळीवर मात्र तशी शांतता होती. परंतु, मागील आठवड्यापासून खरातचे मैदान सिन्नरचे राजकारणीही गाजवू लागले आहेत.
माजी मंंत्री आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांचे समर्थक नगराध्यक्ष विठ्ठल उगले आणि नगरसेवक ॲड. पंकज जाधव यांनी पत्रकार परिषदेतून खरात प्रकरणी उदय सांगळे यांची एसआयटीमार्फत चौकशी करुन त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी केली. मिरगाव येथील भोंदू अशोक खरातच्या श्री ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात शासनाच्या कोट्यवधींच्या निधीतून विविध कामांसाठी उदय सांगळे यांनी पाठबळ दिले.
जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून एप्रिल २०२१ मधील निर्णयानुसार मिरगाव येथे जलकुंभासाठी आठ लाख ६९ हजार ३४१ रुपयांना मंजुरी देण्यात आली होती. जलकुंभ गावात न उभारता ईशान्येश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आला. देवस्थानसाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाणी परवानगी दिली असताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल, तत्कालिनल पालकमंत्री दादा भसे यांच्या माध्यमातून विकास कामांना मंजुरी मिळवून देण्यात सांगळे यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती, असा आरोप नगराध्यक्ष विठ्ठल उगले आणि नगरसेवक ॲड. पंकज जाधव यांनी केला.
कोकाटे समर्थकांच्या आरोपांना भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खरातबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कधी एकत्र येणे, हा योगायोग असू शकतो. परंतु, खरातशी थेट कोणताही संबंध नसल्याचे सांगळे यांनी नमूद केले आहे. दारणाचे ३९ लाख लिटर पाणी श्री शिवनिका संस्थानला देण्याची परवानगी कोकाटे आमदार असतानाच मिळाल्याकडे सांगळे यांनी लक्ष वेधले आहे. कोकाटे आमदार असताना सिन्नर तालुक्यात भोंदूगिरीचे प्रमाण वाढले. कोकाटे परिवाराने अनेक अघोरी पूजा केल्या आहेत, असा आरोप सांगळे यांनी केला. खरातच्या संस्थानमध्ये कोकाटे समर्थकांचा भरणा असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आरोप केले होते. अशोक खरात यास स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे हे विरोध करायचे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून खरातने सुनील तटकरे यांच्याकडे आग्रह धरला होता. तो त्यासाठी तटकरेंना फोन करायचा की नाही, याचा खुलासा तटकरे यांनी केला पाहिजे, असेही त्यांनी आवाहन दिले होते.
