नाशिक – भविष्य कथन, अडचणीत सापडलेल्या महिलांना वेगवेगळ्या भूलथापा देत भोंदूबाबा अशोक खरातकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड होत आहे. घटस्फोटीत महिलेस लग्नाच्या भूलथापा देत खरातने वारंवार अत्याचार केले. ती गर्भवती राहिल्यानंतर औषधे देऊन तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरातच्या अघोरी कृत्यांचा पाढा ऐकून पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
महिलेवरील अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे एका पाठोपाठ एक समोर येत आहेत. गरोदरपणात करावयाच्या पूजाविधीचे कारण देत खरातने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी रविवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच काही तासांतच आणखी एका पीडीत महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि खरातच्या अघोरी कृत्यांची माहिती दिली. या प्रकरणी अशोक खरात याच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंतरलेले पाणी, अघोरी विधीचा बनाव
पीडित युवतीचे लग्न जमत नसल्याने कुटूंबिय नातेवाईकांच्या सल्ल्याने तिला भोंदूबाबा खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात घेऊन गेले. या ठिकाणी खरातने मंतरलेले पाणी, औषध, अंगारे, खडे व दोरे दिले. दरम्यानच्या काळात पीडित युवतीचे लग्न झाले. मात्र खरातची नजर तिच्यावर होतीच. लग्नानंतर सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या ईशानेश्वर मंदिरात त्याने पती तसेच सासरच्या मंडळींच्या पश्चात तिच्याकडून काही विधी करून घेतले. दोन मुले झाल्यानंतर पतीसोबत तिचे काही वाद होते. या विषयी खरातकडे विचारणा केली असता त्याने ‘तुझा घटस्फोट लिखीत आहे. मागील जन्माची तू अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो. माझ्या नशीबात दोन विवाह आहेत. तू माझ्याशी विवाह कर. मी तुला व तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल.’ असे सांगत पीडितेसोबत असभ्य वर्तन करण्यास सुरूवात केली. पीडितेने त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिला विधीच्या नावाखाली पुन्हा कार्यालयात यावे लागेल असे खरातकडून सांगितले गेले.
गर्भपात, जिवे मारण्याची धमकी…
घटस्फोट झाल्यानंतर पीडित महिला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेली होती. मात्र, तिथेही खरातने वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधून तुझ्या उज्वल भविष्यासाठी नाशिक कार्यालयात पूजा करायची असल्याचे सांगून बोलावून घेतले. २०२२ मध्ये पीडिता पुन्हा त्याच्या कार्यालयात गेली असता २०२७ मध्ये आपल्या लग्नाचा योग आहे असे सांगत कार्यालयात अत्याचार केला. हा प्रकार वारंवार घडु लागला. या काळात पीडित महिला गरोदर राहिली. खरातने तिला औषधे देऊन गर्भपात घडवून आणला. विधीच्या नावाखाली चाललेल्या गैरवर्तनाला पीडितेने विरोध केल्यावर खरातने तुझे भविष्य बरबाद होईल, तुझ्या मुलांचे काही तरी बरे-वाईट होईल अशी भीती दाखवत दमदाटी केल्याचे समोर आले आहे.
