नाशिक – महिलांचे लैंगिक शोषण, कित्येकांची फसवणूक, राज्यात ठिकठिकाणी मालमत्ता खरेदी, अशा कारणांमुळे गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन माहिती बाहेर येत आहे. खरातने कशाप्रकारे अत्याचार केले, त्याचे वर्णन ऐकूण कोणाच्याही अंगावर काटा येईल. परंतु, अशा भोंदूबाबाला बड्या राजकीय मंडळींनी, उद्योजकांनी, शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच मोठे केल्याचे त्याच्याबरोबर असणाऱ्या मंडळींचे समाज माध्यमात येणारे फोटो पाहून म्हणावे लागते. आपले राजकीय भविष्य कसे राहील, आगामी निवडणुकांमध्ये कसा निकाल लागेल,  हे जाणून घेण्यासाठी अनेक बडे राजकीय नेते खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. लोकसभा निवडणुकीवेळी तर उत्तर महाराष्ट्रातील एका महिला नेत्याला खरातने त्यांच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी पूजा करण्यासही भाग पाडले होते, असे समोर येत आहे.

एका महिलेने केलेल्या लैंगिक छळवणुकीच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरातविरुध्द पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरातला.१८ मार्च रोजी नाट्यमयरित्या अटक केली. तेव्हांपासून खरात पोलीस कोठडीत असून २९ मार्चपर्यंत त्याचा पोलीस कोठडीतील मुक्काम न्यायालयाने वाढविला आहे. सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून खरातची सखोल चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत खरातच्या एकेक सुरस कथा बाहेर येत आहेत. राजकीय नेते खरातचे कसे गुलाम झाले होते, त्याचा कसे पाया पडत होते, हे विविध फोटोंमधून पुढे आले आहेत. त्यामुळे या संबंधित राजकारण्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

अंकशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या अशोक खरातकडे आपले भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच काही विपरित घडणार असल्यास त्यावर उपाय करण्यासाठी अनेक जण येत असत. त्यात राजकीय मंडळींचाही भरणा होता.  लोकसभा निवडणुकांवेळी उत्तर महाराष्ट्रातील एक महिला भोंदू अशोक खरातकडे गेली असता त्याने “धक्कादायक निकाल लावून देतो” असे म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. खरातच्या नाशिक येथील  कार्यालयात संबंधित राजकीय महिला नेत्या आणि तिचे कुटुंब वारंवार जात असल्याचीह माहिती समोर येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील ही महिला नेता नेमकी कोण, याची चर्चा राजकीय मंडळींमध्ये रंगली आहे. विशेष तपास पथकाच्या चौकशीला या महिला नेत्यालाही सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकांना ज्योतिषाच्या आधारे, संकटातून मुक्तीच्या नावाने, उज्ज्वल भविष्याच्या आशेने अगदी सहजगत्या फसविले जाते, हे अशोक खरातने दाखवून दिले. आपल्या अंध भक्तांना कधी चिंचोके एक लाख रुपयांपर्यंत विकणे, त्यांना नकली साप आणि वाघाच्या कातडीचे भय दाखविणे, अंगठीत घालण्यासाठी खडे, मंतरलेले पाणी  देण्याच्या नावाने लुबाडणे, असे प्रकार करणारा खरात अजून एकाप्रकारे त्याच्याकडे येणाऱ्यांना लुबाडत होता. ‘तुर्कस्तानातील मध’ असल्याची थाप ठोकत त्याने अनेकांना सहजगत्या गंडवल्याचे उघड झाले आहे.