नाशिक – महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०२२ मध्ये शिर्डीला आले होते. साई मंदिरात पाद्यपूजा आणि आरती केल्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा शिर्डीहून अकस्मात थेट सिन्नर तालुक्यातील श्री ईशानेश्वर मंदिरात पोहोचला. या मंदिरात त्यांनी सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली होती. यावेळी तत्कालिन शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही त्यांच्याबरोबर होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या या मंदिरात मंत्री तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बड्या राजकीय मंडळींचा नेहमीच राबता राहिल्याचे मिरगावचे ग्रामस्थ सांगतात.

महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात अध्यक्ष असणाऱ्या श्री शिवनिका संस्थानचे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशानेश्वर मंदिर आहे. भोंदू खरात भविष्यही सांगत असल्याने राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे अनेक दिग्गज राजकारणी येण्यास खऱ्या अर्थाने शिंदे यांच्या भेटीनंतर सुरुवात झाली. शिंदे हेही भविष्य जाणण्यासाठीच आल्याची दौऱ्यावेळी चर्चा रंगली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तेव्हां हे खरे असेल तर ते अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. श्री शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांनी शिंदे हे देवदर्शनासाठी आले होते. शेतकरी तसेच जनतेसमोरील अडचणी, संकटे दूर व्हावीत, यासाठी त्यांनी प्रार्थना केल्याचे म्हटले होते.

अंकशास्त्र अभ्यासक म्हणून मिरवणाऱ्या संशयित खरातने राजकीय वर्तुळात स्वत:चे वेगळे वलय निर्माण केले. संस्थानच्या कार्यकारी मंडळात खुद्द राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा समावेश आहे. त्यांनी खरातचे पाद्यपूजन केले. ‘पितृतुल्य गुरूमाऊली’ असा त्याचा जाहीर गौरवपूर्ण उल्लेखही केला होता. अडचणी निवारण्यासाठी किंमती खड्यांची विक्री, धार्मिक विधी, कर्मकांड ही भोंदू बाबाची कार्यपद्धती राहिली. त्याच्याकडून भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक मंत्री, राजकीय नेते उत्सुक असायचे, असे सांगितले जाते. मिरगावच्या मंदिरात भेट देणारे अथवा खरातची भेट घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके, याच गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर अशा अनेकांचा समावेश असल्याचे बोलले जाते.

यातील काहींची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित झाली आहेत. यातील एक छायाचित्र तर संशयित खरातने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घेतलेल्या भेटीचे आहे. मंत्री शहा हे सिन्नरला आले नव्हते. खरात त्यांना दिल्ली वा इतरत्र भेटल्याची शक्यता वर्तविली जाते. राजकीयदृष्ट्या अडचणीत असणारे बीडमधील एका माजी मंत्र्यानेही खरातची भेट घेतल्याची चर्चा आहे. खरात यास जेव्हां अटक करण्यात आली, त्यावेळीही त्याने काही मंत्र्यांना फोन करुन आपला राजकीय प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांंचे म्हणणे आहे.

सिन्नरमधील ईशानेश्वर मंदिरात आजवर अनेक मंत्री, राजकीय नेते येऊन गेल्याची नाशिक ग्रामीण पोलिसांची माहिती आहे. परंतु, तेव्हा खरातविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव मंत्री, नेते मंडळींनी देवस्थानात दर्शन वा त्याची भेट घेतलेली असू शकते, असा अंदाज पोलीस वर्तुळातून वर्तविला जातो.