नाशिक: श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ३२ बनावट खाती उघडून सुमारे ५८ लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात भोंंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात पतसंस्थेचे संस्थापक, सिन्नर (स्टाईस) सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आणि श्री शिवनिका संस्थानचे माजी सरचिटणीस नामकर्ण आवारे यालाही सिन्नर पोलिसांनी अटक केली.

महिलांचे लैंगिक शोषण, खंडणी, जमीन बळकावणे, फसवणूक असे गुन्हे दाखल असणाऱ्या खरातचे कुंदेवाडी येथील श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेतील उद्योग पुढे आले होते. या संदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यात खरातसह पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. शिर्डी येथील गुन्ह्यात पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर खरात न्यायालयीन कोठडीत होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सिन्नर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सहाकयक निरीक्षक रुपाली चव्हाण आणि पथकाने बुधवारी खरातला सिन्नर येथील न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षातर्फे गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने खरातला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक भामरे यांनी दिली. न्यायालयात आणल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

प्रकरण काय ?

सिन्नर परिसरातील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कुंदेवाडी येथे तक्रारदार आणि इतर साक्षीदार अशा ३२ लोकांची बनावट खाती उघडण्यात आली. पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी यांनी खाते उघडतांना आवश्यक कागदपत्रांची पाहणी केली नाही. योग्य ती कारवाई न करता पतसंस्थेच्यावतीने तक्रारदाराचे खाते उघडत त्या खात्यात १० ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांचा गैरव्यवहार तक्रारदाराच्या संमतीशिवाय झाल्याचे हे प्रकरण आहे.

नामकर्ण आवारेला बेड्या

या गुन्ह्यात पतसंस्थेचे संस्थापक, सिन्नर (स्टाईस) सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष नामकर्ण आवारेला सिन्नर पोलिसांनी अटक केली. आवारे हा श्री शिवनिका संस्थानच्या कार्यकारी मंडळातील सरचिटणीस म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत होता. त्याच्याकडून अशोक खरातचे ‘सिद्ध पुरुष’ म्हणून उदात्तीकरण झाले होते. ‘असा मी नामकर्ण’ या आत्मकथनपर पुस्तकात त्याने खरातचे चमत्कार, भविष्यवाणी खरे ठरल्याचा दावा केला होता. आवारे कुंदेवाडीतील श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेचा संस्थापकआहे. काही काळ या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खरातची नियुक्ती झाली होती. एसआयटीने आवारेची चौकशी केली होती. गुरुवारी आवारेला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.