नाशिक – महिला लैंगिक शोषण प्रकरणी चौथ्या गुन्ह्यात भोंदूबाबा अशोक खरातची न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. पीडिता मुलगा होण्यासाठी आणि कौटुंबिक अडी अडचणी दूर करण्यासाठी तोडगा मिळावा म्हणून भोंदूबाबाकडे जात होती. संशयिताने गुंगीकारक औषध देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. मी देवाचा अवतार असून तू माझ्याशी संबंध केल्याने शुद्ध झाल्याचा दावा करीत या प्रकाराविषयी वाच्यता न करण्याबाबत धमकावले होते.

तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या खरातला विशेष तपास पथकाने चौथ्या गुन्ह्यात अटक करून मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला. एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत खरातच्या ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात हा प्रकार घडला. पीडिता कौटुंबिक अडचणी निवारण आणि मुलगा व्हावा म्हणून भोंदूबाबाकडे जात होती.

खरातने तिला वेळोवेळी रंगीत खडे दिले. तांब्याच्या भांड्यातील पाणी व पेढा खाण्यास देऊन तिचा विनयभंग केला. पाण्यातून काहीतरी गुंगीकारक औषध तो देत असे. पीडिता गुंगीत असताना भोंदूबाबाने तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध केल्याचा हा गंभीर गुन्हा असल्याकडे सरकारी पक्षाने लक्ष वेधले. या गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असून संशयिताकडे सखोल तपास करणे बाकी आहे. त्याने पीडितेला खाण्यासाठी दिलेला पेढा व पाण्यात काय मिसळले होते, याची माहिती मिळवायची आहे. भोंदूबाबा स्वताकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पीडितेला डोळे बंद करून तुला काय इच्छा आहे याचा विचार कर असे सांगून मंत्र पुटपटत असे. धार्मिक विधीच्या नावाखाली त्याने आणखी काही गैरप्रकार केले का, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी खरातला पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी ॲड. बागडे यांनी केली.

बचाव पक्षाने पोलीस कोठडीला विरोध केला. पूर्वीचे गुन्हे या गुन्ह्यासारखे असून तपासही सारखाच आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देण्याची गरज नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. यावर सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता किरण बेंढभर यांनी प्रतिवाद केला. संशयिताची गुन्हा करण्याची पद्धत एकसारखी असली तरी पीडिता वेगवेगळ्या असून प्रत्येक गुन्ह्याची वस्तूस्थिती ही वेगळी असल्याचे नमूद केले. खरातने विवाहित, विधवा, अविवाहित अशा सर्वांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे जाणून घेत खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.