नाशिक – विवाहितेच्या लैंगिक शोषण प्रकरणी दुसऱ्या गुन्ह्यात अटक झालेल्या भोंदूबाबा अशोक खरातला गुरुवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून हजर करण्यात आले. अर्धा तासपेक्षा अधिक चाललेल्या सुनावणीत खरात प्रारंभी काही काळ हात जोडून उभा होता. न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना त्याने थोडक्यात उत्तरे दिली. चेहरा निर्विकार होता. अपराधीपणाचे कोणतेही भाव किंवा दडपणही जाणवले नाही.
महिला अत्याचार प्रकरणी पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या खरातला दुसऱ्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने अटक केली. खरातला न्यायालयात आणल्यावर मोठी गर्दी उसळते. मध्यंतरी काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षिततेच्या कारणास्तव विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी खरातला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर केले. मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
खरात हात जोडून न्यायालयासमोर उभा होता. यावेळी पहिल्या गुन्ह्यात खरातची बाजू मांडणारे ॲड. सचिन भाटे हे उपस्थित होते. दुसऱ्या गुन्ह्यात बाजू मांडण्यासाठी वकीलपत्रावर खरातची स्वाक्षरी नव्हती. दृकश्राव्य माध्यमातून त्याला हजर केल्यामुळे स्वाक्षरी होणे शक्य नव्हते. ही बाब सुनावणीपूर्वीच त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती.
प्रारंभी, न्यायाधीश इचपुराणी यांनी संशयिताला नाव विचारले. त्यावर खरातने उत्तर दिल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात ॲड. सचिन भाटे हे वकील म्हणून तुमची बाजू मांडू इच्छितात, याची कल्पना देताच खरातने लगेच संमती दिली. त्यानंतर सुनावणीला सुरूवात झाली. एसआयटीचे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि सहायक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी दुसऱ्या गुन्ह्याचे गांभिर्य, प्रदीर्घ काळ पीडितेवर झालेला अत्याचार, गोळ्या देऊन तिचा गर्भपात, एका व्यक्तीला देण्यासाठी बाटलीत दिलेले दिव्य जडीबुटीचे औषध, पीडितेसह आई-वडिल व भावाचे घेतलेले आधार कार्ड, पॅनकार्ड आणि छायाचित्रांचाविषयी माहिती देऊन या तपासासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
खरातचे वकील ॲड. भाटे यांनी त्यास विरोध केला. पहिल्या गुन्ह्यात यातील बराचसा तपास झाला असून पुन्हा त्याच कारणांसाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. हा संपूर्ण युक्तिवाद सुरू असताना खरात निर्विकारपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नव्हते. काही काळ जोडलेले हात नंतर त्याने समोर धरले होते. बचाव पक्षाच्या वकिलाचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने संशयित खरातकडे काही बोलायचे आहे का, तुमच्यावतीने वकिलांनी मांडलेले पुरेसे आहे का, अशी विचारणा केल्यावर त्याने ते पुरेसे असल्याचे सांगितले.
सुनावणीत खरात फारसा काही बोलला नाही. एकदा चक्कर आल्यासारखे वाटून खरातचा तोल जात असल्यासारखे वाटल्यावर कुणीतरी त्याला आधार दिल्याचे दिसले. न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना खरातने थोडक्यात उत्तरे दिली. कुठलाही ताण वा दडपण त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही.
