नाशिक – महिला लैंगिक शोषण प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यात भोंदूबाबा अशोक खरातला जिल्हा न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आता तिसऱ्या गुन्ह्यात खरातला वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

​महिला अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा खरातविरुद्ध एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. एसआयटी प्रत्येक गुन्ह्याचा तपास स्वतंत्रपणे करीत आहे. पहिल्या गुन्ह्यात खरातला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती, तर दुसऱ्या गुन्ह्यात सात दिवस पोलीस कोठडी मिळाली. ही मुदत बुधवारी संपुष्टात आल्यानंतर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून खरातने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे बाकी आहे. त्यामुळे पोलीस कोठडीचा हक्क राखून खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि सहायक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी केली.​न्यायालयाने खरातला २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.

यावेळी सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यात संशयित खरातचा सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती दिली. त्या गुन्ह्यात त्याचा ताबा देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली. खरातची वैद्यकीय तपासणी करून नाशिकरोड कारागृहात नेण्यात येईल. कारागृहातील प्रक्रिया पूर्ण करून तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. गुरुवारी खरातला या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले जाईल, असे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. दरम्यान, खरातविरोधात लैंगिक शोषण प्रकरणी दाखल गुन्हे पाहता त्याची पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी (कारागृह) आणि पुन्हा पोलीस कोठडी अशी वारी सुरू झाल्याचे दिसून येते.

​भोंदूबाबाचा पर्दाफाश कसा झाला?

​सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने तक्रार दिली आहे. भोंदूबाबाने त्याला सातव्या महिन्यात वाईट व दृष्ट शक्तींपासून गरोदर स्त्रीला खूप सांभाळावे लागते. मी एक विधी करीन, ज्यामुळे तुझ्या पत्नीवर दृष्ट शक्तींचा परिणाम होणार नाही आणि तिची प्रसूती (डिलिव्हरी) सुरळीत होईल. तसेच त्या विधीमुळे तुझ्या पत्नीला मुलगाच होईल, अशा भुलथापा दिल्या होत्या.​ तक्रारदार पत्नीला घेऊन आला असता भोंदूबाबाने तिच्यावर अत्याचार केले. ही बाब पीडितेने सांगितल्यावर तक्रारदाराने भोंदूबाबाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

भोंदूबाबा खरात केबिनमध्ये काय करतो हे पाहण्यासाठी त्याने मित्राच्या मदतीने केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. केबिनमधील चित्रीकरण त्याने नंतर पेनड्राईव्हमध्ये काढून घेतले. अनेक महिला व मुलींना गुंगीकारक पदार्थ देऊन त्यांना मोहित करून खरात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. खरातचा पर्दाफाश करण्यात सीसीटीव्हीच्या चित्रफिती महत्त्वाच्या ठरल्या. दोन पेनड्राईव्हमधील या चित्रफिती तपास यंत्रणेकडे असल्याचे सांगितले जाते.