नाशिक – महिलेवरील अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची धक्कादायक प्रकरणे आता एकापाठोपाठ एक समोर येऊ लागली आहेत. गरोदरपणात करावयाच्या पूजाविधीचे कारण देत खरातने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. अडचणी घेऊन विश्वासाने येणाऱ्या महिलांशी भोंदूबाबा अघोरी कृत्य करीत असल्याचे पुढे आले आहे.

मंत्री आणि राजकीय नेत्यांचे भविष्य कथन, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशानेश्वर मंदिराची स्थापना या माध्यमातून दबदबा निर्माण करणारा खरात हा भक्तांच्या अडचणींवर तोडगा अथवा फलप्राप्ती होण्यासाठी मंत्र-तंत्राच्या आधारे विविध उपाय सांगून महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात एका पीडितेने हिंमत दाखवल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात खरातकडे गरोदर पत्नीला घेऊन गेलेला पती तक्रार देण्यासाठी पुढे आला.

२१ नोव्हेंबर २०२३ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील कॅनडा कॉर्नरवरील ओकस प्रॉपर्टीज या खरातच्या कार्यालयात शोषणाचा हा प्रकार घडला. गरोदरपणातील विधी करावयाचे सांगून खरातने अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास पतीसह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कार्यालयात विश्वासाने येणाऱ्या महिलांशी खरातने अघोरी प्रकार केले. गुंगीकारक पदार्थ खाण्यास आणि द्रव्य पिण्यास देत असे. महिलांना मोहित करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत असे. अशाच दुसऱ्या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध बलात्कार आणि जादू टोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी दाखल गुन्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर तिच्या लग्नाआधी आणि लग्नानंतर गुंगीचे औषध देऊन, आपण कृष्णाचा अवतार असल्याचे सांगून अत्याचार केल्याचे समोर आले. दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर खरातला सायंकाळी विशेष तपास पथकाकडून शहर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या कार्यालयात त्याची चौकशी सुरू होती.

विशेष पथकाचा आता ‘एमपीए’तून तपास

महिलेचे लैगिंक शोषण आणि जादूटाणा प्रतिबंधक अधिनियमान्वये नाशिकमध्ये खरातविरुध्द दाखल गुन्ह्यांसह वावी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात या विषयाशी संबंधित अन्य प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आपले तात्पुरते कार्यालय रविवारपासून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अर्थात एमपीएमध्ये हलवले.

यापूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या हिमांशू पोलीस क्लब हाऊस येथून पथकाचा तपास सुरू होता. मध्यवर्ती भागातील या ठिकाणी प्रसारमाध्यमांचा गराडा असे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्याच्या दृष्टीने हे ठिकाण योग्य नव्हते. बहुदा हाच विचार करून विशेष तपास पथकाने त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतून पुढील तपास करण्याचे निश्चित केल्याचा अंदाज वर्तवविला जातो.

पोलीस प्रबोधिनी परिसरात कुणालाही थेट प्रवेश नसतो. संवेदनशील गुन्ह्याच्या तपासासाठी हे ठिकाण योग्य असल्याचे मानून पथकाने तेथून कामकाज सुरू केले. रविवारी दिवसभर संशयित अशोक खरातची चौकशी सुरू होती, असे सांगण्यात आले.