नाशिक- राजकीय मंडळींसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरातविरुध्द एका महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यावर खरातचे बिंग फुटले. धार्मिकतेच्या आड लपलेला त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष असलेल्या अशोक खरात याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखेने त्याच्याविरुध्द कठोर कारवाईला सुरुवात केली आहे.
त्याअंतर्गत त्याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील फार्म हाऊसवर छापा टाकला. या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे तसेच इतरही काही वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे खरात नेमका काय उद्योग करीत होता, हे पुढे येऊ लागले आहे.महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर भोंदू अशोक खरात चांगलाच अडचणीत आला आहे.
पोलिसांनी नाशिक येथील त्याच्या कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या. या चित्रफितींमध्ये अनेक नामांकित महिला, सेलिब्रिटी यांची माहिती असल्याचे सांगितले जाते. तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेला स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातवर धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप आहे.
अशोक खरातविरुध्द महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि चारही बाजूंनी टीका, आरोप करण्यात येऊ लागल्यानंतर राज्य सरकारला या प्रकरणाची गंभीर दखल घेणे भाग पडले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआटी स्थापन करण्यात आले आहे. तेजस्विनी सातपुते यांच्याकडे या तपास पथकाची जबाबदारी आहे.
सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील रहिवासी असलेला अशोक खरात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अंकगणिताच्या आधारे भविष्य सांगण्यास सुरुवात केल्याने त्याच्याकडे गर्दी वाढू लागली. बडे राजकीय नेते, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजही त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येऊ लागले.
त्याच्या मंदिरात दर्शन घेऊ लागले. त्यात विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. रुपाली चाकणकर अशोक खरातच्या शिवनिका संस्थानमध्ये विश्वस्त असल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून आरोप होऊ लागले आहेत. खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर आता खरातकडे कोण कोण येत होते, याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी अशोक खरातच्या घराची झडती घेतल्यानंतर मिरगाव येथील फार्म हाऊसवर बुधवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यात महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांना सापडले. त्यात अशोक खरातची मालमत्ता आणि अन्य काही कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. फार्म हाऊसमधून एक पिस्तूलदेखील पोलिसांनी जप्त केले. काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडल्याचे सांगितले जाते.
