नाशिक: ​एका महिलेच्या तक्रारीमुळे भोंदू बाबा अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे उद्योग समोर आले आहेत. या भोंदू बाबाकडे भविष्य जाणून घेण्यासाठी किंवा आपल्या अडचणी सोडवण्यासाठी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसह बड्या, प्रतिष्ठित कुटुंबांतील मंडळी व महिलांचे येणे-जाणे असल्याचे सांगितले जाते. एक महिला भोंदू बाबा खरातविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे आली. तिच्या जबाबातून खरातची वासनांध वृत्ती आणि अंधश्रद्धेचा पगडा समोर आला आहे.

मात्र, या संवेदनशील प्रकरणाच्या वार्तांकनात पीडित महिलेची ओळख उघड होईल अशी छायाचित्रे, चित्रफिती आणि माहिती प्रसारित होत असल्याने संबंधित महिला व तिचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत. हा प्रकार तक्रारदार म्हणून पुढे येणाऱ्यांना मागे खेचत असून, ही बाब तपासकार्यात अडथळा आणणारी ठरत आहे. पीडितेची ओळख उघड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा विशेष तपास पथकाने दिला आहे.

​शहरातील एका विवाहितेवर भोंदू बाबा अशोक खरातने लग्नाआधी तसेच लग्नानंतरही शारीरिक अत्याचार केले. या अत्याचाराविरोधात सात वर्षांनंतर तिने मौन सोडत आपल्यावरील अन्यायाचा पाढा पोलिसांसमोर वाचला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरुद्ध बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकामार्फत (एसआटी) या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

​या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर पीडित महिलेच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. कारण विविध माध्यमांतून तिची आणि तिच्या कुटुंबीयांची ओळख प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उघड होऊ लागली आहे. काहींनी छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित केल्या, तर काही बातम्यांमध्ये पीडित महिलेची ओळख उघड होईल अशी वक्तव्ये, तिचा पत्ता, नातेवाइकांची नावे आणि गावाचे नाव प्रसिद्ध करण्यात आले. तक्रारीतील संपूर्ण घटनाक्रम अशा पद्धतीने मांडला गेला, ज्यावरून पीडितेची ओळख सहज पटू शकेल. या प्रकारामुळे पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. ते नैराश्याच्या गर्तेत सापडले असून प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे विशेष तपास पथकाने म्हटले आहे. ​

या पार्श्वभूमीवर, वृत्तवाहिन्या, त्यांचे इन्स्टाग्राम हँडल्स, यूट्यूब चॅनल्स, न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडियावरील वार्ताहरांच्या बेजबाबदार वर्तनाला आवर घालण्याची वेळ विशेष तपास पथकावर आली आहे.

​कारवाईचा इशारा…

​भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७१ (१) नुसार, पीडित महिलेची कोणतीही ओळख उघड करता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत पीडितेची ओळख उघड झाल्यास गुन्हा नोंदवून त्यात दोन वर्षांचा कारावास आणि दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या गुन्ह्याबाबत वृत्तांकन करताना पीडित महिलेची ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या बातमीमुळे पीडितेची ओळख उघड झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा विशेष तपास” पथकाने दिला आहे.

तपासातही अडथळे

​पीडित महिलेची छायाचित्रे किंवा चित्रफिती ज्या पद्धतीने समोर येत आहेत, त्यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकारामुळे इतर तक्रारदार महिला पुढे येण्यास घाबरत आहेत. आपली ओळख उघड होईल आणि कुटुंबाला त्रास होईल, ही चिंता त्यांना सतावत आहे. प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीमुळे तक्रारदार महिलांचे पाऊल मागे खेचले गेले असून, तपासकामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष तपास पथकाकडून महिलांचे प्रबोधन करून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

​महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे. माध्यमांनी वार्तांकन करताना जबाबदारी बाळगावी. विशेषतः समाजमाध्यमांवर महिलांविषयी टिप्पणी करताना भान ठेवावे. अशा विचित्र टिप्पण्यांमुळे महिलेला जबर धक्का बसला तर ती नैराश्यात जाऊ शकते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची जिद्द हरवून बसेल.
​— डॉ. हेमंत सोननीस (मानसोपचारतज्ज्ञ)