नाशिक – महिला लैंगिक शोषण प्रकरणी सलग सात गुन्ह्यांत कमाल १४ ते किमान दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेल्या अशोक खरातला आठव्या विनयभंग व धमकावण्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्यातही त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. परंतु, न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. भूलथापा देऊन भक्ताची आर्थिक पिळवणूक केल्याच्या गुन्ह्यात खरातला वर्ग करण्यात आले असून शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
विशेष तपास पथकाने आठव्या गुन्ह्यात खरातला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर केले. दाम्पत्य खरातला कार्यालयात भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा पतीला बाहेर पाठवून खरातने विवाहितेच्या हातावर काळा दगड फिरवून तिचा विनयभंग केला. मी स्पर्श केल्यामुळे तुझे कल्याण होणार आहे, मी तुझी शुध्दी केली आहे असे सांगून याबद्दल कुणाला काही सांगितल्यास तुझ्यावर देवाचा कोप होईल म्हणून धमकी दिली होती. संशयिताने मंतरलेला दगड पीडितेच्या हातावर फिरवला होता.
हा दगड कुठून आणला, भोंदूगिरीच्या नावाखाली खरातने आणखी काही गैरप्रकार केले आहेत का, याचा सखोल तपास करण्यासाठी तीन दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी केली. खरात तक्रारदाराच्या कुटुंबियांना अनेक वर्षांपासून ओळखत होता. त्याने पीडितेसोबत असा प्रकार केला आहे का, मंत्रविधी करताना काय भोंदूगिरी केली याबद्दल तपास करणे आवश्यक असल्याचा मुद्दा सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आला.
बचाव पक्षाने पोलीस कोठडीला विरोध केला. ज्या मुद्यांवर खरातला पोलीस कोठडी मागितली गेली, त्यावर यापूर्वी अनेकदा पोलीस कोठडी मागितल्याकडे लक्ष वेधण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. खंडणी व फसवणुकीच्या नवव्या गु्न्ह्यात खरातला वर्ग करण्यात आले आहे. शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
फसवणूक कशी केली ?
जागतिक पातळीवर लॉजिस्टिकचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका भक्ताकडून भोंदूबाबा अशोक खरातने अवतार पूजेच्या नावाने अलिशान मोटार, २१ देशांमध्ये भ्रमंती, अमेरिकेत वैद्यकीय उपचार, सिन्नर तालुक्यातील फार्म हाऊसच्या बांधकामासह तुर्कस्तानहून किंमती फर्निचर अशा विविध प्रकारे लुबाडणूक केली. भोंदूबाबा धुळफेक करीत असल्याचे लक्षात आल्यावर संबंधिताने हा संपूर्ण खर्च मागितल्यावर खरातने त्याच्याविरुध्दच पाच कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार वावी पोलीस ठाण्यात केली होती.
राजेंद्र जासूद यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खरातविरुद्ध गुन्हा दाखल आहे. २१ देशात आपणास भ्रमंती न घडविल्यास नागदेवता कोपून दंश करेल, तुझा मृत्यू होईल, अशी भीती भोंदूबाबाने घातली. त्या देशांमधून ऊर्जा प्राप्त करण्याच्या नावाखाली खरातने २०१८ मध्ये म्यानमार, ग्रीनलँडपासून परदेश भ्रमंतीला सुरूवात करीत युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश या ठिकाणी नेऊन तिथे पूजा केली. या सर्व भ्रमंतीचा खर्च जासूद यांनी केला. याच दरम्यान खरातला वैद्यकीय उपचारासाठी चारवेळा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे नेले. त्याचा ३० लाख रुपयांचा खर्चही आपल्याकडून वसूल केला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
