नाशिक – आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा अघोरी पूजेसाठी त्याच्या भक्तांना बाजारात किरकोळ भावाने मिळणारे चिंचोके विशेष खडा म्हणून एक लाख रुपयांपेक्षा अधिक दराने विकत होता. यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली आहे.
भविष्य पाहण्यासाठी आलेल्या महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी खरात त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्याचे ठोकताळे खरे ठरल्यावर महिलांचा त्याच्यावर विश्वास बसत असे. भविष्य सांगणे, लग्न जमवणे, कुटूंबातील वादविवाद, बिघडलेले नातेसंबंध, आर्थिक भरभराट, मुलांचे उज्ज्वल भविष्य, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी उच्चभ्रु घरातील महिला भविष्य पाहण्यासाठी खरात याच्याकडे जात होत्या. काही वेळा तो अघोरी पूजेचा बनाव करीत असे. या पूजेसाठी बाजारात मिळणाऱ्या चिंचोक्यांचा खरात वापर करीत होता.
बाजारात १०० रुपये किलो या दराने मिळणाऱ्या चिंचोक्यांची तो मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचा. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना चिंचोका कापडाने घासायला सांगे. तसे केल्याने चिंचोक्याला चमक यायची. या चिंचोक्यांचा उपयोग तो पूजेसाठी अथवा अंगठीतील खडा म्हणून तो करायचा. त्याच्या ग्राहकांना यासाठी एका चिंचोक्याचे १० हजारापासून एक लाख रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत होते. पुजेसाठी देण्यात येणारे खडेही बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दुसरीकडे संशयित खरात बाजारातून नियमितपणे प्लास्टिकची पन्नी, बनावट कापडी वाघ आणि बनावट प्लास्टिकचे साप खरेदी करायचा. त्याचा वापर तो सिन्नरच्या मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात करीत होता. खरात प्लास्टिक पन्नीचा बनावट साप तयार करायचा. त्याच्यासह बाजारातून आणलेले बनावट साप आणि बनावट कापडी वाघ मंदिरात ठेवून तो येणाऱ्या बड्या भाविकांच्या पूजेवेळी फलप्राप्ती झाल्याचे दाखविण्यासाठी त्यांचा वापर करायचा. पूजेवेळी साप दिसल्याने घाबरलेल्या भाविकांचा त्याच्यावरील विश्वास दृढ व्हायचा. अघोरी कृत्य करून त्यांच्याकडून भोंदूबाबा पैसे वसूल करीत होता.
मंतरलेले पाणी ?
भविष्य जाणण्यासाठी किंवा अडचणींवर उपाय शोधण्यासाठी आलेल्या महिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना अशोक खरात हा पाणी पिण्यासाठी देत असे. हे पाणी मंतरलेले असल्याचे तो सांगत असे. पाणी पिल्यानंतर महिलांना एक प्रकारची बेशुध्द अवस्था येत होती. हे शरिरात वेगळ्या प्रकारची उत्तेजना निर्माण करणारे पाणी पूजेत शुध्दीकरण, शक्तीवर्धन यासाठी दिले जात होते. त्याचा दर लहान बाटलीसाठी काही हजारांच्या घरात होता. हे पाणी खरातने अनेकांना विकले असल्याचे तपासात उघड झाले आहे.
