नाशिक – भोंदूबाबा अशोक खरातने किती प्रकारे आणि कशा प्रकारे महिला, शेतकरी, जमीनमालक, भक्त, व्यावसायिकांना लुबाडले, याचे एकेक कारनामे दररोज बाहेर येत आहेत. प्रारंभी केवळ महिलांच्या लैंगिक शोषणापुरताच असलेले खरात प्रकरण पुढे वेगवेगळे टप्पे गाठत गेले. खरातने केवळ महिलांच नव्हे तर, बड्या राजकीय मंडळींना, उद्योगपतींना, उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांनाही कसे जाळ्यात ओढले, याच्या अचाट आणि अफाट कथा ऐकावयास मिळत आहेत. त्यात आता अभिनेता अक्षय कुमारच्या गाजलेल्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटाचीही भर पडली आहे. या चित्रपटाचा आणि अशोक खरातचा काय संबंध, असा प्रश्न कोणालाही पडेल. परंतु, घडले मात्र तसेच.
अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर महिला आणि फसवणूक झालेल्याचा तक्रारीचा ओघ सुरूच आहे. लैंगिक छळ आणि बळकावलेल्या मालमत्तांसंबंधी तक्रारी येत आहेत. महिला अत्याचाराच्या तक्रारीचा आकडा वाढला असून आणखी ११ महिलांनी पुढे येत खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पतीच्या, मुलांच्या किंवा कुटुंबीयांच्या मृत्युची भीती दाखवून जाळ्यात ओढल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या सर्व तक्रारींची शहानिशा करून एसआयटी पुढील कारवाई करणार आहे. अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी महिला अत्याचाराचे ८ तर फसवणुकीचे ४ गुन्हे आहेत.
जादूटोणा, काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणाऱ्या अशोक खरातचे अनेक प्रताप आहेत. महिलांवरील अत्याचार प्रकरणात अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या कोट्यवधींच्या व्यवहारांवर आता तपास यंत्रणांकडून लक्ष दिले जात आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मालमत्ता तसेच बँकांच्या १३२ खात्यांमधील कोट्यवधींच्या व्यवहारांचा त्यात समावेश आहे. जगदंबा पतसंस्थेत ३२ तर समता पतसंस्थेत १०० खाती अशी सापडली आहेत की ज्यात वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव आहे.. या १३२ खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात पुढे आले आहे.
एसआयटी चौकशीत खरातने दिलेल्या कबुलीत अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. कोणताही चमत्कार, वशीकरण नव्हे तर केवळ हातचलाखीने महिलांना भीती दाखवून त्यांचे शोषण केल्याची कबुली अशोक खरातने दिल्याचे सांगण्यात येते. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असेही तो म्हटल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेता अक्षय कुमारचा ‘स्पेशल २६’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटात बोगस आयकर अधिकारी भल्याभल्यांना कसे लुबाडतात, ते दाखविण्यात आले होते. अशोक खरातने ‘स्पेशल २६’ चित्रपट पाहिला की नाही, माहीत नाही. परंतु, आपल्या श्रीमंत भक्तांना लुबाडण्यासाठी त्याने ‘स्पेशल २६’ प्रमाणेच डाव रचला. खरात हा बोगस आयकर अधिकारी श्रीमत भक्तांकडे पाठवायचा. आणि त्यांना लुटायचा, अशी माहिती समोर आली आहे. अशोक खरात याला आपल्या भक्तांपैकी कोणाकडे किती घबाड असेल, हे ओळखायचा. त्याचे भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे बोगस आयकर अधिकारी पाठवायचा. आणि त्यांना धाक दाखवायचा. भीतीने गळपटलेले व्यावसायिक, उद्योजक तडजोड करण्यासाठी तयार होत. अशाप्रकारे तो भक्तांकडून मोठी रक्कम उकळायचा, अशी माहिती पुढे आली आहे. आपल्याच भक्तांना अशाप्रकारे लुटणारा अशोक खरात हा खरोखर लुटारुच म्हटला पाहिजे.
