नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचे नाव महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणानंतर आता भीत दाखवून, धाकदपटशा दाखवून जमीन बळकावण्याच्या प्रकरणातही गाजू लागले आहे. जमीन बळकावणे एकट्या खरातला शक्य नसल्याने त्याला या प्रकरणात निश्चितच जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल, महसूल अधिकारी यांची साथ असण्याचा विशेष तपास पथकाला (एसआयटी) संशय आहे. त्यामुळे एसआयटी चौकशीचा पुढील फेरा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळेच की काय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बेनामी जमीन खरेदीत खरातला साथ देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा देणे भाग पडले आहे.

अशोक खरातची एसआयटीमार्फत चौकशी सुरु आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध आतापर्यंत १२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ गुन्हे हे लैंगिक शोषणाचे, तर ४ गुन्हे सावकारी, खंडणी आणि फसवणूकीचे आहेत. एका कांदा व्यापाऱ्याची ६५ लाख रुपये किमतीची जमीन केवळ २० लाख रुपयांत बळकावल्याचा गुन्हा खरातविरुध्द दाखल आहे. या व्यवहारात खरात आणि व्यापाऱ्याची ओळख एका दलालाच्या माध्यमातून झाली होती. संबंधित दलालाने खरातचा फायदा करुन देण्यात वाटा उचलल्याची माहिती पुढे येत आहे.

२०१४ मध्ये सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील कांदा व्यापारी आणि अशोक खरात यांची ओळख एका दलालाच्या मध्यस्थीने झाली. व्यापाऱ्याने पैशांची तातडीची गरज निर्माण झाल्याने पाथर्डी ते गौळाणे परिसरातील जमीन विक्रीला काढली. या जमिनीची किंमत सुमारे ६५ लाख रुपये होती. परंतु, खरातने आपला फसवणुकीचा फंडा वापरत ही जमीन अल्प किंमतीत पदरात पाडून घेतली. खरातने संबंधित कांदा व्यापाऱ्याला आपण ‘देवाचा अवतार’ असल्याचे भासवले.

वृध्दांना घरांमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याने त्यांच्यासाठी वृद्धाश्रम बांधण्याची आपली इच्छा असल्याचे खरातने कांदा व्यापाऱ्याला पटवून दिले.आणि ६५ लाख रुपयांची जमीन अवघ्या २० लाखांत मिळवली. ही जमीन खरातने मुलगी तृप्तबालाच्या नावावर करून घेतली. ही जमीन घेतली तेव्हांपासून तशीच आहे. अशोक खरातने त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याला भूखंड मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यासाठी ८५ लाख रुपये घेतले. व्यापाऱ्याच्या लक्षात काहीशा उशिराने अशोक खरातचा डाव लक्षात आल्यावर त्याने पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी खरातने “मी देवाचा माणूस आहे. पैसे परत मागितले तर देवाचा कोप होईल,” अशी भीती दाखवली. त्यामुळे व्यापारी दबून राहिला होता. परंतु, अखेर तक्रारीनंतर खरातविरुध्द गुन्हा दाखल झाला.

एसआयटीने अशोक खरातच्या बँक खात्यांतील आणि इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता जमीन खरेदी-विक्री दलालांबरोबरचे संशयास्पद व्यवहार आढळले. जमीन खरेदी-विक्रीचे असे व्यवहार सरकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होणार नाहीत, असा एसआयटीला संशय आहे. त्यामुळे आता जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल, महसूल अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेनामी संपत्ती जमा करण्यात खरातला महसूल अधिकाऱ्यांची साथ असल्यास एसआयटीकडून आपल्याकडे जी नावे येतील, अशा दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेै असल्याचे सांगण्यात येते.