नाशिक – स्वत:च्या अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असणारा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान वापरायचा आणि सुगंधी कस्तुरी लोकांना देऊन फलप्राप्ती होते, अशा भूलथापा देत असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्यासमोर मांडली आहे. या बाबत सखोल चौकशी करून संशयित खरातविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वयेही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संशयित खरातच्या भोंदूगिरीविरोधात अंनिसने आक्रमक भूमिका घेतली आहे. अंनिसचे राज्य सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे व जिल्हा सचिव महेंद्र दातरंगे यांनी नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणात एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेतली. कॅप्टन खरातच्या सर्व गैरकृत्यांची सखोल चौकशी करून त्याच्यासह त्याच्याशी संबंधित सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत निवेदन सादर केले. यावेळी अंनिस कार्यकर्त्यांनी काही गोपनीय माहिती त्यांना दिली. भोंदूबाबा वन्यजीव प्राण्यांच्या शरीराचे अवशेष जादूटोणा करण्यासाठी वापरत असल्याचे समजते. त्याची चौकशी होऊन वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम लावावे, असा आग्रह अंनिसने धरला आहे.
या भोंदूला व त्याच्या सर्व साथीदारांना यापूर्वीच जेलवारी होणे आवश्यक होते. दोन-अडीच दशकांपासून या भोंदूने बड्या लोकांना भविष्य वर्तवण्याचा बहाणा करून त्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले असल्याची महाराष्ट्र अंनिसला दाट शंका होती. त्याबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र अंनिसने त्याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोठे प्रतिष्ठित लोक तसेच बडे राजकीय नेतेमंडळी त्याच्या पाठीमागे असल्याने त्यांचे त्याला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असावे, आता ते उघड झाले आहे, याकडे अंनिसने लक्ष वेधले. भोंदू खरातने ज्योतिष सांगण्याच्या आणि विविध धार्मिक विधी, कर्मकांडे करण्याच्या नावाखाली लोकांचे, विशेषतः महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा उद्योग सुरू केला आणि वाढवत नेला, हे आता लपून राहिलेले नाही. धार्मिक पूजा विधीच्या नावाखाली तो काही वन्य प्राण्यांचे अवयवही उपयोगात आणत असे, अशी शक्यता अंनिसने व्यक्त केली.
राजकीय दबावाची शंका
संशयित खरातच्या अटकेनंतर ५८ रहस्यमय चित्रफिती पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसेच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची अंनिसला दाट शंका आहे. त्यामुळे तपास यंत्रणेवर देखील राजकीय दबाव येण्याची दाट शक्यता अंनिसने व्यक्त केली. म्हणून अतिशय सावधगिरीने पीडितांचा शोध घ्यावा, या भोंदूच्या विरोधातले सर्व सबळ पुरावे मिळवून त्याच्यासह या आर्थिक, लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. असे घडल्यास सध्या जोरात सुरू असलेल्या भोंदूगिरीला, ज्योतिषांच्या भंपकबाजीला आणि त्या माध्यमातून होणाऱ्या विविध प्रकारच्या शोषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. लोकांमध्येही ज्योतिषाचा फोलपणा लक्षात येऊ शकेल, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष?
जादूटोणाविरोधी कायद्यान्वये त्या त्या पोलीस ठाण्याचे प्रमुख हे त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुवाबाजी, भोंदूगिरी रोखतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही त्याबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही, असे भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणावरून अधोरेखित झाले आहे, असाही मुद्दा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मांडला.
