नाशिक: महिलेने तिच्यावरील अत्याचार प्रकरणी धाडस दाखवून पोलिसांमध्ये तक्रार केल्याने भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यांची मालिकाच सुरु झाली. खरातने किती महिलांवर अत्याचार केले, कुठे कुठे मालमत्ता घेतली, कोणा कोणावर दबाव तंत्राचा वापर केला, हे सर्व विशेष तपास पथकाच्या चौकशीत बाहेर येईलच. पोलीस या प्रकरणात नीरज जाधव या संशयिताचीही चौकशी करीत आहेत. त्याच्याकडून अशोक खरातचे उद्योग, खरातकडे येणारी मंडळी याची माहिती घेतली जात आहे. यानिमित्ताने कधी एकमेकांचे सहकारी असणारेच अशोख खरात आणि नीरज जाधव आता एकमेकांचे शत्रु झाल्याचे दिसत आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थांनचा अध्यक्ष अशोक खरात यास महिलेवरील अत्याचारप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने १८ मार्च रोजी अटक केली. यानंतर त्याच्या नाशिक येथील कार्यालयाच्या तपासणीत ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणारा खरात हा भाविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक भक्तांबरोबर भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांचेही येणे-जाणे होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून, तपासात दररोज वेगवेगळी धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
पोलीस तपासात नाशिक येथील खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या नीरज जाधवचे नाव समोर आल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. नीरज जाधव आता खरातविरुध्दच्या माहितीसाठी पोलिसांना कामास येणार असल्याने कार्यालयातील एकमेकांचा सहकारी खरात आणि जाधव आता एकमेकांविरुध्दचे वैरी झाले आहेत. जाधवने खरात आणि एका महिलेचा व्हिडिओ काढला होता, कोणत्या तरी कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला. आणि जाधव हा संबंधित अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून खरातला धमकावू लागल्याचे सांगितले जाते.
जाधवने खरातच्या कार्यालयातून महिलांवरील अत्याचारांचे व्हिडिओ मिळवले होते. त्याने खरातकडे काही रकमेचीही मागणी केली होती. परंतु, खरातकडून पैसे न मिळाल्याने त्याने पीडित महिलांना धमकावण्यास सुरुवात केली. शिर्डीतील एका विवाहित महिलेला तिचे कथित अश्लील अथवा खोडसाळपणा केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावले. संबंधित पीडितेने १२ मार्च रोजी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर एकामागोमाग एक प्रकरणांचा उलगडा होत खरात जाळ्यात सापडला.
नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले. जाधवने पीडित महिलांना फोन केले काय, याची तपासणी होत आहे. पोलीस तपासात जाधवकडे अनेक व्हिडिओ सापडल्याचे सांगितले जाते. नीरज जाधव हा खरातच्या कार्यालयात काम करीत होता. त्यामुळे त्याला खरातच्या कृत्यांविषयी सर्वाधिक माहिती असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून त्या दिशेने तपास केला जात आहे. शनिवारी विशेष तपास पथकाने खरात आणि जाधव या दोघांची समोरासमोर बसवून चौकशी केल्याचैही कळते.
