नाशिक – सिन्नर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील एका कार्यक्रमात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरातबरोबर शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे होते.

खरातने या ठिकाणी पूजा केली. एमआयडीतील अधिकाऱ्यांची केसरकर, चाकणकर यांनी बैठक घेतली. या सर्वांचे खरातशी निकटचे संबंध होते. त्यांचे आर्थिक व्यवहारही असू शकतात. त्यामुळे चाकणकर आणि केसरकर यांनाही चौकशी कक्षेत घ्यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने विशेष तपास पथकाकडे केली.

महिला लैंगिक शोषण प्रकरणी भोंदूबाबा खरातविरोधात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष तपास पथकाच्या प्रमुख (एसआयटी) तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. खरातशी वारंवार संपर्कात राहणाऱ्यांची छायाचित्रे आणि माहिती पथकाला सादर केली.

यात सिन्नर औद्योगिक वसाहतीतील एका कार्यक्रमात भोंदूबाबा खरातबरोबर तत्कालीन शिक्षणमंत्री केसरकर आणि महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा चाकणकर यांच्या उपस्थितीबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. वरकरणी हे प्रकरण लैंगिक शोषणाचे वाटत असले तरी त्याची व्याप्ती मोठी दिसते.

आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांचा सहभाग संशयास्पद वाटतो. आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी आणि इतर लोकांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणकर यांच्या माध्यमातून महिला भोंदू खरातच्या संपर्कात येत असत. ही गंभीर बाब असल्याकडे ठाकरे गटाने एसआयटीचे लक्ष वेधले. वर्षभरापूर्वी भोंदूबाबाचे हे संपूर्ण प्रकरण एका पीडितेने उघड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या महिलेसह पत्रकारालाही दमदाटी करण्यात आली.

शिक्षणमंत्री केसरकर यांचे खरातशी निकटचे संबंध होते. अशा परिस्थितीत पद प्रतिष्ठेचा वापर करून संबंधित व्यक्ती सत्य दडवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे केसरकर, चाकणकर यांच्यासह त्याच्या वारंवार संपर्कात आलेल्यांना चौकशीच्या कक्षेत घेण्याची मागणी विशेष तपास पथकाकडे करण्यात आली.

सिन्नरमधील कार्यक्रमात केसरकर, चाकणकर, गोडसे

शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे हे भोंदूबाबा खरातला हात दाखवून भविष्य जाणून घेत असलेली चित्रफित समाजमाध्यमात आली आहे. पत्रकार परिषदेत अंधारे यांनी सिन्नर औद्योगिक वसाहतीतील भूमीपूजन कार्यक्रमात गोडसे हे भोंदूबाबाबरोबर पूजा करीत असल्याचे छायाचित्र सादर केले. या कार्यक्रमात तत्कालिन शिक्षणमंत्री केसरकर आणि चाकणकर यांची खरातबरोबरची कार्यक्रमातील, बैठकीतील छायाचित्रे दाखवत ‘ये रिश्ते क्या कहलाते है,’ असा प्रश्न अंधारे यांनी केला.

औद्योगिक वसाहतीतील कार्यक्रमात तत्कालीन शिक्षणमंत्री आणि महिला आयोग नेमके काय करत होता. संबंधितांनी खरातला मोठे केले. त्याच्याशी ते वारंवार संपर्कात होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशानेश्वर मंदिरात सपत्नीक पूजा केली होती. याचे काय अर्थ काढायचे, असा सवालही त्यांनी केला.