नाशिक – नाशिक शहर व परिसरात जमिनीच्या वादातून विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा सहभाग उघड होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत आतापर्यंत तीन लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये एका माजी महापौरांचाही समावेश आहे. याप्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पंचवटीतील लामखेडेमळा, तारवालानगर येथील रहिवासी योगेश बाळकृष्ण दाभाडे यांनी व्यवसाय वृद्धीसाठी वर्षभरापूर्वी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडून सुमारे ९० लाख रुपये हातउसनवार घेतले होते. त्यातील काही रक्कम त्यांनी परतही केली होती; मात्र उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी मुर्तडक यांच्याकडून सातत्याने तगादा लावला जात होता. यादरम्यान दाभाडे यांना धमकावणे आणि घरात घुसून कुटुंबीयांसमोर अपमानास्पद वर्तन करणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, दाभाडे वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल असतानाही संशयितांनी तेथे जाऊन पैशांसाठी दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बुधवारी पुन्हा घरी येऊन शिवीगाळ व धमक्या दिल्यानंतर दाभाडे प्रचंड मानसिक तणावाखाली गेले. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, शेतजमीन बळकवण्याच्या उद्देशाने उभ्या पिकावर नांगर फिरवून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार पिंपळगाव खांब शिवारात घडला. याप्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश बोराडे (५५, रा. वडनेर पाथर्डी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
शिवाजी पांडुरंग चुंबळे व त्यांच्या साथीदारांनी १४ ते १६ एप्रिल दरम्यान बोराडे यांच्या शेतात बेकायदा शिरून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखल्याने बोराडे या हल्ल्यातून बचावले. संशयितांनी बोराडे आणि त्यांचा पुतण्या योगेश यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शेतातून हुसकावून लावले. तसेच, शेतातील फ्लॉवरच्या पिकावर नांगर फिरवून मोठे आर्थिक नुकसान केले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न, दंगल, अतिक्रमण आणि मालमत्तेचे नुकसान या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
तिसऱ्या घटनेत, एका सेवानिवृत्त सैनिकाला घरासाठी भूखंड देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) महापालिकेतील गटनेते केशव पोरजे, त्यांचा शालक विशाल मालुंजकर आणि गणेश जाधव यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
