नाशिक – सध्या आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत आहे. नवे संशोधन, नवे तंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्रे उभारली गेली पाहिजेत. सरकारला साह्यभूत अशी त्यांची भूमिका ठरणार आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

येथे अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या हस्ते झाले. नाशिक हे धार्मिक आणि आध्यात्मिक शहर आहे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आता याबरोबरच आरोग्य क्षेत्रातील नव्या वाटचालीने या शहराला नवी ओळख मिळाली आहे. केंद्र शासन आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूर्वक जीवनशैली आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही कार्यरत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. अशोका हेल्थ सिटी केवळ उपचार नव्हे तर संशोधनाचे क्षेत्र बनावे, अशी अपेक्षा बिर्ला यांनी व्यक्त केली.

करोना काळात महाराष्ट्रातील संशोधकांनी विकसित केलेली लस उपयोगात आली, याचा बिर्ला यांनी आवर्जुन उल्लेख केला. यावेळी अशोका ग्रूपचे प्रमुख अशोक कटारिया यांनी, समाजाप्रती बांधिलकी म्हणून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा निर्माणाच्या कामामध्ये अशोका ग्रुप गेल्या २५ वर्षापासून कार्यरत आहे. नाशिक ही कर्मभूमी आहे. समाजाप्रती बांधिलकी म्हणून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातही सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न कायम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. अशोका हेल्थ सिटी मध्ये अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले थीम-आधारित महिला व बाल रुग्णालय, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स अशा महत्त्वाच्या संस्था एकाच परिसरात कार्यरत राहणार असल्याचे अशोक कटारिया यांनी सांगितले.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर , खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, अशोका ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चचे संचालक डाॅ. सुशील पारख, अंकिता पारख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी बिर्ला यांचा प्रभू श्रीराम यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. आभार अंकिता पारख यांनी मानले.