शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले माजी नगरसेवक अस्लम मणियार हे सोमवारी पुन्हा स्वगृही परतले असून त्यांच्यासह काही भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही मुंबई येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.

हेही वाचा >>> नाशिक पदवीधर मतदारसंघात सहा उमेदवारांची माघार, १६ उमेदवार रिंगणात, वाचा संपूर्ण यादी…

माजी नगरसेवक मणियार हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. मात्र, देवळाली गाव येथे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्याशी त्यांचे वाद झाल्यानंतर शिवसेनेतील गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे हे भाजपच्या सहकार्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक, शिंदे गटात सामील झाले. लवटे यांच्यासह नाशिक रोडमधील पाच माजी नगरसेवकांनी अलिकडेच शिंदे गटात प्रवेश केला. परिणामी देवळाली येथील प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिंदे गटातर्फे लवटे हेच उमेदवार राहणार हे निश्चित आहे. लवटे शिंदे गटात गेल्यानंतर मणियार यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>>नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांच्यासह उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी देवळाली गाव येथील प्रशांत जाधव, भाजपचे पदाधिकारी योगेश ओभोर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे नाशिकरोड परिसरात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्यास खा. संजय राऊत, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.