मनमाड – शहरापासून जवळच असलेल्या नागापूर, पानेवाडी परिसरातील भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई-मनमाड भूमिगत वाहिनीला छिद्र पाडून त्यातून पेट्रोल आणि डिझेल चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे येथून दोन किलोमीटरवर असलेल्या अनकवाडे परिसरात उघडकीस आले. कंपनी प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत भारत पेट्रोलियमचे प्रबंधक अर्जुन धर्मराव यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहा मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमाराला भारत पेट्रोलियम कंपनीचे पथक डीसीव्हीजी यंत्राद्वारे मुंबई-मनमाड दरम्यानच्या इंधन वाहिनीवर गस्त आणि सर्वेक्षण करीत होते. मनमाड-येवला रस्त्यावर मौजे अनकवाडे शिवारात इंधन वाहिनीजवळ आवरण निघाल्याचे आढळले. पथकाला संशय आल्याने तिथे यंत्राने खोदकाम करण्यात आले. मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यासमोर पंचनामा करण्यात आला. मुंबई-मनमाड भूमिगत इंधन वाहिनीला छिद्र पाडून इंधन चोरी आणि विक्री करण्याच्या उद्देशाने नुकसान केल्याचे उघड झाले.