नाशिक – शहरातील सर्व शाळांमधील शिक्षकांचा पेहराव व्यवस्थित असावा. महिला शिक्षकांनी साडी, तर पुरुष शिक्षकांनी पांढरा सदरा आणि काळ्या रंगाची ट्राऊझर पँट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम, चित्रे असलेला पेहराव करू नये. शिक्षकांनी जीन्स आणि टी-शर्टचा वापर करू नये, अशी सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना केली आहे.

नव्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होत असून महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून नियोजन प्रगतीपथावर आहे. मनपाच्या शहरात ८८ प्राथमिक आणि १२ माध्यमिक शाळा असून तिथे एक हजारहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. खासगी व शासकीय अनुदानित विविध माध्यमांच्या शाळांची संख्या बरीच मोठी आहे. शासन परिपत्रकाच्या आधारे मनपा प्रशासनाधिकारी पाटील यांनी मनपा क्षेत्रातील सर्व शिक्षकांसाठी पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा. गडद रंग, चित्रविचित्र नक्षीकाम, चित्र असणारा पेहराव कुणीही करू नये. शाळेत शिक्षकांना जिन्स, टी-शर्ट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. पेहराव स्वच्छ व नीटनेटका असल्याची दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाधिकाऱ्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचित केले आहे.

हेही वाचा – मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास, १६ हजार रहिवाशांची पात्रतानिश्चिती जुलैपर्यंत

हेही वाचा – मुंबई : पावसाळी आजारांबाबत डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

मनपा शाळा, केंद्रांना साडीचा रंग निवडण्याची मुभा

महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेने, केंद्राने आपापल्या शाळेच्या, केंद्राच्या महिला शिक्षकांसाठी साडीच्या रंगाची निवड करून तीच साडी सोमवार ते शुक्रवार परिधान करणे अनिवार्य आहे. महिला-पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (पुरुषांनी बूट) यांचा वापर करावा. स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचा गणवेश असेल. वैद्यकीय कारणास्तव शिक्षकांना बूट वापरण्यातून सवलत मिळणार असल्याचे मनपा प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी म्हटले आहे. मध्यंतरी मनपातून गणवेशाला काही शिक्षकांनी विरोध केला होता. मनपाच्या शाळेत शाळानिहाय पोषाख संहिता आधीपासून अस्तित्वात आहे. मनपा आता सर्व शाळेत एकच पोषाख संहिता लागू करीत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे होते. परंतु, परिपत्रकात प्रत्येक शाळा व केंद्राचा उल्लेख असल्याने त्या, त्या शाळा वा केंद्रातील महिला शिक्षकांना साडीच्या रंगाची निवड करण्याची मुभा असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे सर्व शाळांसाठी एकसमान गणवेशाचा मुद्दा शिक्षण विभागाने निकाली काढल्याचे दिसते. नव्या पोषाखाचा भार शिक्षकांवर पडण्याची चिन्हे आहेत. तीन महिन्यांपूर्वी महिला शिक्षकांसाठी परस्पर विशिष्ठ साडीची निवड झाल्यानंतर गदारोळ झाला होता. महिला शिक्षकांकडून नव्या पोषाखासाठी प्रतिसाडी एक हजार रुपये संकलनाचे प्रयत्न झाल्याचे आक्षेप घेतले गेले होते. परंतु, या तक्रारी तथ्यहीन ठरवत तेव्हा शिक्षण विभागाने साडी खरेदीशी आपला संबंध नसल्याचा दावा केला होता. आताच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळा व केंद्राच्या महिला शिक्षकांना गणवेशाच्या साडीच्या रंगाची निवड करण्यास सांगण्यात आले आहे.