दोन तासांचे रस्ता सुरक्षाविषयक प्रशिक्षण

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अभियानाचा दुसरा टप्पा म्हणून हेल्मेट परिधान न करणाऱ्या ८० दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता ‘नाशिक फस्र्ट’ संस्थेच्या वाहतूक उद्यानात दोन तासांचे रस्ता सुरक्षाविषयक प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १०७ तुकडय़ांमधून ४ हजार २९४ वाहनधारकांचे हेल्मेट वापरण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

शहरांचा दिवसेंदिवस विकास होत असून वाहतुकीतही वाढ होत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे आणि नियमांचे योग्य तऱ्हेने पालन केले जात नसल्याने रस्ता अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यातही दुचाकीचा अपघात झाल्यावर दुचाकीस्वाराच्या डोक्याला मार लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे

मृत्युसंख्येतही वाढ होते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शहर पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेला सुरुवात केली होती. हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांना पंपावर पेट्रोल दिले जात नाही.

आता दुसऱ्या टप्प्यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, शिकवणी आदी ठिकाणी हेल्मेटविना आलेल्या वाहनधारकांसाठी प्रवेश बंद करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित आस्थापनेचा मिळकत व्यवस्थापकाला जबाबदार धरले जाणार आहे. याच सुमारास हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांच्या समुपदेशनावर लक्ष देण्यात आले आहे. अशा वाहनधारकांना ‘नाशिक फस्र्ट’ संस्थेच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीच्या प्रशिक्षणास पाठविले जाते. नऊ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत १०७ तुकडय़ांमधून आतापर्यंत ४ हजार २९४ वाहनधारकांना हेल्मेटचा उपयोग, हेल्मेट घातले नाही, तर काय होते, त्याची गुणवत्ता कशी असावी, अपघाताची कारणे कोणती, मानवी चुका कोणत्या, खराब रस्ते यावर मार्गदर्शन करण्यात आले.

नाशिकमध्ये २५ ते ३५ या वयोगटातील वाहनधारकांचे सर्वाधिक अपघात होतात. अपघातात महाराष्ट्रात नाशिकचा दुसरा क्रमांक असून दिवसाआड एकाचा मृत्यू होतो असे प्रशिक्षणात सांगण्यात आले.

यंदा नाशिक पोलिसांच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या कालावधीतील ७० दिवसांत ३९ जण अपघातात मयत झाले, असे समुपदेशक तथा रस्ता सुरक्षा मार्गदर्शक सोनाली पवार यांनी सांगितले. यावेळी भारत सरकारच्या परिवहन मंत्रालयाचे सदस्य आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य राजेश वाघ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यात रस्ता सुरक्षा क्षेत्रात नागपूरमध्ये लोक सहभागातून अपघात मुक्त नागपूरसाठी केलेले काम, त्यातून शेकडोंचे प्राण वाचलेले प्राण याविषयी माहिती दिली.