scorecardresearch

‘आयुष्मान भारत’चे तोकडेपण

आयुष्यमान भारत योजनेचे नाशिक विभागात पात्र लाभार्थी ५३ लाख ३८ हजार ८९६ इतके असताना केवळ १५ लाख ७६ हजार ५६७ रुग्णांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विभागात ५३ लाभार्थी असताना केवळ १५ लाख रुग्णांनाच ‘गोल्डन कार्ड’; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची नाराजी

नाशिक : आयुष्यमान भारत योजनेचे नाशिक विभागात पात्र लाभार्थी ५३ लाख ३८ हजार ८९६ इतके असताना केवळ १५ लाख ७६ हजार ५६७ रुग्णांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना तत्काळ कार्ड वाटप करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात आरोग्य विभागासह करोना तसेच इतर विषयांचा डॉ. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला. या वेळी डॉ. पवार यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थीना गोल्डन कार्ड वाटपाचा वेग वाढविण्यास सांगितले. बैठकीत नाशिक विभागातील करोनाच्या तिसऱ्या लाटेतील वाढती रुग्णसंख्या आणि केंद्र सरकारने दिलेल्या संभाव्य रुग्णसंख्येच्या प्रमाणात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

त्यात प्राणवायूयुक्त खाटा, अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी दक्षता कक्ष तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधांची कामे, वाढत्या रुग्णसंख्येसाठी तपासणी संच, अद्ययावत प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, प्राणवायू साठय़ाची तयारी या सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. करोना उपचारासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आजपर्यंत कोटय़वधी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. बैठकीत करोना लसीकरणाचादेखील आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या माध्यमातून नाशिक विभागाकरिता पुरेशा प्रमाणात लशींचा साठा देण्यात आला असून आजही पुरेशा प्रमाणात लससाठा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले. नियमित राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत नाशिक विभागाकरिता रु. ४३४ कोटी ३२ लाख निधी हा एका वर्षांकरिता मंजूर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाअंतर्गत आतापर्यंत एका वर्षांत नाशिक विभागात रु. १४८ कोटी ९२ लाख वाटप करण्यात आले आहे. ते यापुढेही सुरू राहणार आहे. तसेच पायाभूत विकासासाठी (त्यात उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय यांची दुरुस्ती, नवीन बांधकामे) रु. ११२ कोटी ६४ लाख निधी मंजूर करण्यात आला असून त्यात ११४ कामे मंजूर असल्याचे सांगण्यात आले.

१२७ कामांसाठी रु. ५८ कोटी ३८ लाख निधी मंजूर

१३ व्या वित्त आयोगातून विभागामध्ये १२७ कामांसाठी रु. ५८ कोटी ३८ लाख निधी मंजूर झाला असून ती कामेही प्रगतिपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी डॉ. पवार यांना दिली. विभागातील ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी एकूण १५ दंत वैद्यकीय शिबिरे मंजूर झाली असून त्याकरिता रु. ६५ लाख अनुदान मंजूर झाले आहे. ते वितरित करण्यात आलेले आहे. बैठकीत नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, सहसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. चारुदत्त शिंदे, डॉ. किरण पाटील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, मनपाचे डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ayushman bharat shortcomings beneficiaries ysh

ताज्या बातम्या