नाशिक – आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत असतांना आजही केवळ पैसे नाहीत म्हणून ५० किलोमीटरचे अंतर दुचाकीने पार करत बाळाचे कलेवर हातात घेत घर गाठण्याची वेळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव परिसरातील बोर्डाची वाडी येथील मेंगाळ कुटूंबियावर आली.
बोर्डाची वाडी येथे मेंगाळ कुटूंब दुसऱ्याच्या शेतात काम करुन उदरनिर्वाह करत आहे. मंगेश मेंगाळ यांची पत्नी संगिता हिला गुरूवारी सायंकाळी प्रसव वेदना सुरू झाल्या. तसेच छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने जवळील मोखाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तब्येतीत होत असलेला चढ -उतार पाहता तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी पहाटे दोन वाजता त्यांना मुलगा झाला.
परंतु, मुलगा झाल्याचा आनंदही त्यांना घेता आला नाही. सकाळी ११ वाजता बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून बाळाचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. आणि घरी जाण्यास सांगण्यात आले. आमच्याकडे गाडी नाही. घरी जाण्यासाठी पैसेही नाहीत, असे मेंगाळ यांनी रुग्णालयातील संबंधितांना सांगितले.
मात्र रुग्णालय व्यवस्थापनाकडून गाडी मिळणार नाही आणि आईला रुग्णालयात दाखल राहु द्या, शनिवारी त्यांनी घरी सोडण्यासाठी गाडी देऊ, असे सांगण्यात आले. ही माहिती घरी सांगितल्यावर भाऊ वहिनीसह त्याची दुचाकी घेऊन आला. त्यांच्याकडे बाळाचा मृतदेह घरी नेण्यासाठी दिल्याचे मेंगाळ यांनी सांगितले. वास्तविक, रुग्णालयाकडून रुग्णांसाठी १०२ किंवा १०८ ही रुग्णवाहिका असो वा जननी शिशु सुरक्षा योजना ही जिवंत बालक, व्यक्तीसाठी आहे.
जिल्हा रुग्णालयाकडून शववाहिकेची तरतूद होत नाही. मात्र जिल्हा आरोग्य विभाग तसेच महानगरपालिकेकडे राज्य स्तरावरून काही शववाहिका या देण्यात आल्या होत्या. त्या शववाहिकांवरील चालक तसेच इंधनाचा विषय यामुळे त्या शववाहिका पडून आहेत. शासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका दुर्गम भागातील नागरिकांना, रुग्णांना बसत आहे. याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
