जळगाव : जिल्ह्यातील प्रवाशांना दुपारच्या वेळी मनमाडसह नाशिक जाण्यासाठी सोयीची ठरणारी बडनेरा–नाशिक रोड संपूर्ण अनारक्षित मेमू रेल्वे गाडी अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या गाडीला आणखी काही महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली असताना, तिचा नाशिकच्या पुढे कसारापर्यंत विस्तार करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
भुसावळ–देवळाली आणि भुसावळ–इगतपुरी या गाड्यांव्यतिरिक्त भुसावळ, जळगावहून दुपारच्या वेळी पाचोरा, चाळीसगाव, मनमाड व नाशिककडे जाण्यासाठी एकही नियमित आणि अनारक्षित रेल्वे गाडी उपलब्ध नाही. ही परिस्थिती लक्षात घेता दुपारी प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाडी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांमध्ये बाराही महिने प्रचंड गर्दी असते. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने उभ्याने प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड स्थानकांदरम्यान सुरू करण्यात आलेल्या मेमू रेल्वे गाडीला जळगाव जिल्ह्यात बोदवडसह भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
बडनेरा–नाशिक रोड मेमू रेल्वे सुरू झाल्याने दुपारच्या सुमारास साडेतीन-चारला जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना हक्काची आणि सोयीची गाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात प्रवाशांची अडचण दूर झाली असून, या गाडीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. विशेषतः दिवाळी तसेच इतर सण-उत्सवांच्या व लग्नसराईच्या काळात वाढणाऱ्या गर्दीत ही मेमू रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरते. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता दर दोन-तीन महिन्यांनी तात्पुरती मुदतवाढ देण्याऐवजी ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यानंतर आता ही गाडी नाशिकच्या पुढे थेट कसारापर्यंत चालविण्यात यावी, यासाठी प्रवासी वर्गाचा रेटा वाढला आहे.
कसाराहून लोकलने मुंबई गाठता येणार
बडनेरा-नाशिक रोड मेमू रेल्वे गाडीने प्रवास करणारे प्रवासी मुंबई जाण्यासाठी नाशिकला उतरतात. त्यानंतर तेथून बस किंवा खासगी वाहनाने कसारा पोहोचतात. तेथून मुंबई जाण्यासाठी लोकल पकडून पुढील प्रवासाचे नियोजन केले जाते. अर्थात, टप्याटप्प्याने प्रवास करताना वेळेसह पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. गाड्या बदलताना बरीच तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे बडनेराहून सुटणारी मेमू कसारापर्यंत चालविल्यास भुसावळसह जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकच्या प्रवाशांना हक्काची मुंबईला घेऊन जाणारी अनारक्षित रेल्वे गाडी उपलब्ध होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर अवलंबून राहण्याची वेळ कदाटित येणार नाही. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींकडून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे.
