जळगाव : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बडनेरा–नाशिक रोडदरम्यान धावणाऱ्या अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वेच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमरावती, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड या मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी १५ जुलैपर्यंतच ही विशेष रेल्वे धावणार होती. मात्र, आता या गाडीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
बडनेरा–नाशिक रोड विशेष मेमू रेल्वे गाडीला गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच अन्य कामानिमित्त मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. विशेषतः भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही अनारक्षित विशेष रेल्वे प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दैनंदिन प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. सणासुदीचा काळ आणि आगामी प्रवासी गर्दी लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
मुदतवाढ नेमकी कुठपर्यंत?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष ही रेल्वे आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत नियमित धावणार आहे. त्याचप्रमाणे परतीची गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित दैनिक विशेषचाही परिचालन कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत दोन्ही गाड्यांच्या एकूण १३४ फेऱ्या होणार आहेत. विशेष रेल्वेचा परिचालन कालावधी वाढविण्यात आला असला, तरी गाडीच्या वेळापत्रकासह मार्ग आणि सर्व निर्धारित थांबे पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना कोणताही बदल न करता पूर्वीप्रमाणेच रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे.
अमरावतीहून सुटण्याचा निर्णय प्रलंबित?
दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार सध्या ०१२११/०१२१२ या क्रमांकाने बडनेरा–नाशिक रोडदरम्यान विशेष स्वरूपात धावणाऱ्या मेमू रेल्वेला नियमित गाडीचा दर्जा देण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्यानुसार ही गाडी भविष्यात ६११२९/६११३० या सुधारित क्रमांकासह अमरावती रेल्वे स्थानकावरून नियमितपणे धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसून मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या ही मेमू सेवा पूर्वीप्रमाणेच ०१२११/०१२१२ या विशेष गाडी क्रमांकासह बडनेरा ते नाशिक रोड आणि नाशिक रोड ते बडनेरा या मार्गावरच विशेष रेल्वे म्हणून सुरू आहे. नियमित क्रमांकासह अमरावतीपर्यंत सेवेचा विस्तार आणि त्याबाबतचे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांनी विशेष गाडीचेच विद्यमान वेळापत्रक आणि क्रमांक ग्राह्य धरावेत, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
