मालेगाव : बागलाण तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम संकटाच्या गर्तेत सापडला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर तब्बल ३० ते ४० दिवसांच्या प्रदीर्घ खंडामुळे मका, बाजरी,कांदा व अन्य पिके करपू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्ता भरणे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदने दिली आहेत. यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने तालुक्यातील कोरडवाहू शेतीबरोबरच बागायती क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत चालल्याने पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे.अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शेतीमालाला बाजारात आधीच अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यातच आता कांदा व मका ही मुख्य पिकेही धोक्यात आल्याने बळीराजासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना उत्पन्नाची कोणतीही हमी उरलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा अतिरिक्त बोजा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाने वेळीच ठोस हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा दीपिका चव्हाण यांनी दिला.
केवळ कागदावरील पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर न थांबता प्रशासनाने प्रत्यक्ष शेतशिवारातील परिस्थितीची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आगामी काळात केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार असल्याने प्रशासनाने आत्तापासूनच टँकर, चारा आणि पिण्याच्या पाण्याचा टंचाई आराखडा तयार करणे गरजेचे आहे. दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी कुटुंबांना बसत असल्याने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, असेही चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
